माल्याच्या अटकेकडे किंगफिशर कर्मचाऱ्यांचे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 03:15 IST2017-04-19T03:15:52+5:302017-04-19T03:15:52+5:30
हजारो कोटी रुपयांचे बँकांचे कर्ज बुडवून रातोरात लंडनला पळून गेल्याने चर्चेत आलेल्या मद्यसम्राट आणि किंगफिशर एअर लाईन्सचे मालक विजय माल्याच्या मंगळवारी लंडनमधील अटक

माल्याच्या अटकेकडे किंगफिशर कर्मचाऱ्यांचे लक्ष
मुंबई : हजारो कोटी रुपयांचे बँकांचे कर्ज बुडवून रातोरात लंडनला पळून गेल्याने चर्चेत आलेल्या मद्यसम्राट आणि किंगफिशर एअर लाईन्सचे मालक विजय माल्याच्या मंगळवारी लंडनमधील अटक आणि जामिनावर सुटकेच्या काही तासांच्या नाट्याने सर्वांच्याच
भुवया उंचावल्या. यामुळे बेरोजगार झालेल्या किंगफिशरच्या कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. तसेच आपले थकविलेले वेतन मिळणार की नाही, अशी भीती त्यांना सतावत आहे.
मुळचा बंगळूरचा असलेला विजय माल्या याची मुंबईसह देश आणि विदेशात कोट्यवधीची मालमत्ता आहे. मुंबईच्या विलेपार्ले परिसरात त्याचे १०३.५ कोटींचे किंगफिशर हाऊस आहे. तर गोव्यातही ७३ कोटींचा किंगफिशर विला आहे. माल्याने २००३ मध्ये किंगफिशर एअरलाईन्सची स्थापना करून आपल्या लाडक्या पुत्राला म्हणजे सिद्धार्थला भेट दिली होती. या कंपनीचे कार्यालय मुंबईत असून यामुळे अनेकांना बेरोजगार मिळाला होता. मात्र, माल्याने विविध बँकामधून कर्ज घेत ते न फेडल्यामुळे २०१२ पासून तो चर्चेत आला. त्यात किंगफिशर एअरलाईन बंद पडल्याने अनेक कामगार बेरोजगार झाले. त्यांना कामावरुन काढून टाकल्यामुळे विमानतळाबाहेर निदर्शने करण्यात आली होती.
कर्ज बुडवेगिरी करत विजय मल्ल्याने स्टेट बँक आॅफ इंडिया आणि इतर सहकारी अशा एकूण १७ बँकाचे जवळपास ९००० कोटी रुपये बुडवत २०१६ साली ब्रिटनमध्ये पळ काढला होता. माल्याने कर्मचाऱ्यांचे वेतनही न देता पळ काढल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. (प्रतिनिधी)
माल्याला
भारतात आणणार...
माल्याविरोधात भारतीय तपास यंत्रणेकडे सबळ पुरावे आहे. त्यामुळेच त्याला आज अटक झाली आहे. या पुराव्यांच्या आधारेच लवकरच त्याला भारतातही आणले जाईल. याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे ईडीचे वकील अॅड. हितेन वेडेगावकर यांनी सांगितले.