"राजा प्रचंड तणावात राहील पण..."; ३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या भेंडवड घटमांडणीचे भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 05:37 AM2021-05-16T05:37:06+5:302021-05-16T05:39:52+5:30

यंदा पीक परिस्थिती साधारण, तर कमी पर्जन्यमानाचे संकेत, पृथ्वीवर नैसर्गिक संकटे

"The king will be under great stress but ..."; Bhendwal bhavishyavani 2021 on Narendra Modi | "राजा प्रचंड तणावात राहील पण..."; ३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या भेंडवड घटमांडणीचे भाकीत

"राजा प्रचंड तणावात राहील पण..."; ३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या भेंडवड घटमांडणीचे भाकीत

Next
ठळक मुद्देराजकीय उलथापालथ संभवत नाही. पानसुपारी घटामध्ये कायम होतीराजाला राजकीय, आर्थिक, नैसर्गिक तसेच परकीय शत्रूंच्या संकटांचा सामना करावा लागेल. नैसर्गिक, आर्थिक तथा रोगराईच्या संकटामुळे देशाची तिजोरी खिळखिळी होईल. 

जयदेव वानखडे

जळगाव जामोद (जि. बुलडाणा) : यंदा पृथ्वीवर नैसर्गिक संकटे येतील. रोगराई, परकीय घुसखोरी, अतिवृष्टीसारख्या आपत्तींना देशाला तोंड द्यावे लागेल. राजकीय परिस्थिती अस्थिर असेल. यावर्षी कमी पर्जन्यमानाचे संकेत आहेत; त्यामुळे पीक परिस्थिती साधारण राहील, तर नैसर्गिक संकटांमध्ये जीवितहानी मोठ्या प्रमाणात होण्याची भाकिते भेंडवळ घटमांडणीतून वर्तवण्यात आली.

३०० वर्षांची परंपरा लाभलेल्या या घटमांडणीची भविष्यवाणी शनिवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराज यांनी जाहीर केली. शेती यंदा पर्जन्यमान कमी राहील. जून महिन्यात कमी पाऊस असेल. सार्वत्रिक पाऊस होणार नाही.  जुलै महिन्यात सार्वत्रिक आणि चांगला पाऊस पडेल. या महिन्यात अतिवृष्टी होण्याचे संकेत आहेत; तर ऑगस्टमध्ये जून-जुलैपेक्षा कमी पाऊस असेल. सप्टेंबर महिन्यात सर्वांत कमी पाऊस पडेल. यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थितीची शक्यता आहे. अवकाळी पावसाचे प्रमाण कमी राहील, पण प्रचंड चाराटंचाई निर्माण होईल. 

पीकपरिस्थिती
कपाशी हे पीक यावर्षी चांगले येईल व भाव चांगला मिळेल. ज्वारीचे पीक साधारण येईल, मात्र भावात तेजी राहील. तूर पीक मोघम येईल. मूग पीक साधारण येईल व भावात तेजी असेल. उडीद, तीळ, बाजरी, मटकी, जवस आणि तांदूळ ही पिके चांगले येतील. मात्र, कुठे-कुठे नासाडीची शक्यता आहे. गहू पीक चांगले येईल मात्र भावामध्ये मंदी राहील; तर हरभरा पीक साधारण येईल व भावामध्ये तेजी राहील. 

संरक्षण व्यवस्था 
करडी हे धान्य संरक्षण व्यवस्थेचे प्रतीक म्हणून गटांमध्ये ठेवले जाते. यावर्षी देशाच्या संरक्षण व्यवस्थेवर जास्त ताण राहील. तसेच शत्रूचे प्रतीक असलेले मसूर हे धान्य आत-बाहेर विखुरले होते. यावरून शत्रूंच्या कारवाया सुरूच राहतील. परराष्ट्राच्या घुसखोरीमुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल.  

राजा कायम राहील
राजकीय उलथापालथ संभवत नाही. पानसुपारी घटामध्ये कायम होती; परंतु गादीवर म्हणजे पानावर माती दिसून आली. त्यावरून राजाला राजकीय, आर्थिक, नैसर्गिक तसेच परकीय शत्रूंच्या संकटांचा सामना करावा लागेल. त्यामुळे राजा प्रचंड तणावात राहील. नैसर्गिक, आर्थिक तथा रोगराईच्या संकटामुळे देशाची तिजोरी खिळखिळी होईल. 

अशी झाली घटमांडणी 
घटामध्ये १८ प्रकारांची धान्ये गोलाकार मांडण्यात आली. घटाच्या मधोमध खड्डा खोदून त्यामध्ये पावसाळ्याच्या चार महिन्यांचे प्रतीक असलेली चार मातीची ढेकळे ठेवण्यात आली आणि त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात आली. 

घागरीवर पृथ्वीचे प्रतीक असलेली पुरी आणि चारापाण्याचे प्रतीक असलेले सांडोळी, कुरडई, पापड ठेवण्यात आला. बाजूला चवीचे प्रतीक भजे आणि वडा ठेवण्यात आला; तर घागरीच्या बाजूला राजा आणि राजाची गादी म्हणजेच पानसुपारी ठेवण्यात आली. रात्रभर कुणीही या घटाकडे फिरकले नाही.

भाकिते विश्वासपात्र नाहीत - अंधश्रद्धा निर्मूलन समिती
दरम्यान, कोणताही वैज्ञानिक आधार नसलेल्या व संभाव्यतेच्या नियमाद्वारे कोणीही कोणतेही भाकिते वर्तवली तरी अंदाजे ५० ते ६० टक्के खरे ठरू शकणाऱ्या भेंडवळ घटमांडणीच्या भाकितांवर जनतेने विश्वास ठेवू नये,असे आवाहन अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक रघुनाथ कौलकार यांनी केले.

Web Title: "The king will be under great stress but ..."; Bhendwal bhavishyavani 2021 on Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.