अहमदनगरमध्ये दलित कुटुंबाची हत्या
By Admin | Updated: October 22, 2014 14:26 IST2014-10-22T06:20:00+5:302014-10-22T14:26:56+5:30
जवखेडे खालसा येथे दलित कुटंबातील तिघांचा हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून घराजवळील एका विहिरीत फेकून देण्याची संतापजनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली़ सं

अहमदनगरमध्ये दलित कुटुंबाची हत्या
पाथर्डी (जि. अहमदनगर) : जवखेडे खालसा येथे दलित कुटंबातील तिघांचा हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून घराजवळील एका विहिरीत फेकून देण्याची संतापजनक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली़ संजय जगन्नाथ जाधव (४२), जयश्री संजय जाधव (३८) तर सुनील संजय जाधव (१९) अशी मृतांची नावे आहेत. खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील जाधववस्ती जवळील शेतात हे कुटुंब रहात असून, मोलमजुरी तसेच गवंडी काम करीत होते. जाधव वस्तीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर त्यांचे शेत आहे. सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून धारदार शस्त्रांनी माय, बाप व लेकाचा खून करुन मृतदेह जवळच असलेल्या पडक्या विहिरीत तुकडे तुकडे करून टाकले. मंगळवारी सकाळी त्यांच्या घरासमोर बांधलेली शेळी ओरडत असल्याचा आवाज त्यांच्या शेजारीच असलेल्या नातेवाईकांना आला. शेळी का ओरडते हे पाहण्यासाठी ते गेले असता घर उघडे दिसले तसेच कपडे अंथरलेले दिसले. हे तिघे जण दवाखान्यात गेले असतील, त्यामुळे त्यांनी तिसगाव, शेवगाव व नगर येथील दवाखाने पाहिले. त्यानंतर नातेवाईक दुपारी परत गावात आले. नातेवाईकांनी विहिरीत डोकावले असता मृतदेह विहिरीत तरंगताना दिसले. त्यांनी ही माहिती पोलीस व ग्रामस्थांना दिली. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक संजय पाटील, पोलीस निरीक्षक सुभाष अनमुलवार घटनास्थळी पोहोचले. नगरहून धडक कृती दलाच्या जवानांचे पथक दाखल झाले. रात्री जिल्हा पोलीसप्रमुख लखमी गौतम यांनी घटनास्थळाला भेट देवून माहिती घेतली. रात्री उशिरा श्वानपथक घटनास्थळी आले होते. रात्री नऊ वाजता जवानांच्या पथकाने एक जणाचा मृतदेह बाहेर काढला. मृत कुटुंबाची मोटारसायकल घटनास्थळापासून २ किलोमीटर अंतरावरील जांभूळदेव शिवारात आढळून आली. (प्रतिनिधी)