किडनी विक्रेत्याची बडदास्त खरेदीदारांच्या पैशांतून !
By Admin | Updated: December 24, 2015 03:05 IST2015-12-24T03:05:57+5:302015-12-24T03:05:57+5:30
किडनी तस्करी प्रकरण; देवेंद्र सिरसाटला बुधवारपर्यंत पोलीस कोठडी.

किडनी विक्रेत्याची बडदास्त खरेदीदारांच्या पैशांतून !
अकोला : किडनी तस्करी प्रकरणात किडनी विक्रेत्यांचा हॉटेलमध्ये राहण्याचा, जेवणाचा व इतर खर्च आरोपींनी किडनी खरेदीदारांकडून वसूल केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. शिवाजी कोळी, देवेंद्र सिरसाट, आनंद जाधव, विनोद पवार यांनी किडनी देणारे हे गरजू रुग्णांचे नातेवाईक असल्याचे भासविण्यासाठी त्यांची बनावट कागदपत्रे आणि छायाचित्रे तयार केली. या आधारावर त्यांनी गरजू आणि धनाढय़ रुग्णांना त्यांची किडनी विकली. किडनी प्रत्यारोपण करण्याच्या खर्चासोबतच, किडनीचा पैसा आणि किडनी विक्रेत्यांच्या औरंगाबाद येथील हॉटेलमध्ये राहण्याचा, खाण्या-पिण्याचा खर्च त्यांनी गरजू रूग्णांकडून वसूल केला. मंगळवारी खदान पोलिसांनी आरोपी देवेंद्र सिरसाट व शांताबाई खरात यांच्या राहुलनगरातील घरांची झडती घेतली. झडतीदरम्यान पोलिसांनी देवेंद्र सिरसाट आणि त्याच्या पत्नीच्या बँक खात्याचे पासबूक जप्त केले. शांताबाईचा मुलगा जानराव खरात याचीसुद्धा पोलिसांनी चौकशी केली. त्याने नांदुरा येथील विजय झांबड यांच्या कुटुंबीयांनी त्यांना मोबाइल दिला होता; परंतु नंतर तो मोबाइल व त्यातील सीमकार्डची विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती त्याने चौकशीदरम्यान दिली.