अपहरणकर्ता राहुल शेंडे कुख्यात

By Admin | Updated: July 17, 2014 00:58 IST2014-07-17T00:58:56+5:302014-07-17T00:58:56+5:30

पवन गणपत ढगे या बालकाचे अपहरण करणारा राहुल अरुण शेंडे हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्या नावावर यापूर्वी दोन मुलांच्या अपहरणासह इतरही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती वर्धा पोलिसांनी दिली.

Kidnappers Rahul Shende notorious | अपहरणकर्ता राहुल शेंडे कुख्यात

अपहरणकर्ता राहुल शेंडे कुख्यात

पाच गंभीर गुन्हे उघड : विविध गुन्ह्यात ‘वॉन्टेड’, आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता
वर्धा : पवन गणपत ढगे या बालकाचे अपहरण करणारा राहुल अरुण शेंडे हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्या नावावर यापूर्वी दोन मुलांच्या अपहरणासह इतरही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती वर्धा पोलिसांनी दिली. राज्यातील विविध भागातील पोलिसांना तो हवा आहे. वर्धा पोलीस बुधवारी सकाळी पवनसह त्याला घेऊन वर्धेत दाखल झाले. यानंतर पवनला त्याच्या आईच्या स्वाधीन केले. माय-लेकाच्या भेटीने वातावरण भारावले होते.
पवनच्या अपहरणप्रकरणी राहुल शेंडेविरुद्ध कलम ३६३, ३६४ अ,३८५ व ३८६ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अपहरणकर्ता राहुल पवनला सोबत घेऊन दुचाकीने सतत तीन दिवस एकेक जिल्हा पालथा घालत होता. सुमारे ३० जणांची पोलीस पथके त्याच्या मागावर होती. अखेर तिसऱ्याच दिवशी त्याला नगर येथे अटक करण्यात पोलिसांना यश आले.
दरम्यान, त्याने नागपूर, अकोला, जालना, औरंगाबाद आणि नगर असा प्रवास केल्याचे उघड झाले. नगर येथे एका ट्रॅव्हल्समधून उतरताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत पवनही होता. राहुलची ओळख पटविण्याकरिता पोलिसांनी राहुलकडून फसवणूक झालेला हिंगोली जिल्ह्यातील वैभव देशमुख याला सोबत घेतले होते. त्याने राहुलला ओळखताच अटकेची कारवाई करण्यात आली. अपहरणकर्ता राहुलसह पवनला घेऊन बुधवारी पोलीस पथक वर्धेत दाखल झाले.
राहुल हा गुन्हे करण्यात तरबेज आहे. धुळे, वर्धा आणि पुणे येथे त्याने फसवणुकीचे गु्न्हे केलेले आहे. यासह वरोरा, नांदेड येथे अपहरणाचेही गुन्हे त्याच्या नावावर आहेत.
याप्रकरणात संबंधित पोलिसांना तो हवा आहे. विशेष म्हणजे त्याने खोट्या नावाचा आधार घेत हे गुन्हे केल्याची माहिती वर्धा पोलिसांनी दिली.
ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्यासह हिंगणघाट व वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश चाटे, हिंगणघाटचे ठाणेदार मोतीराम बोडखे, कंट्रोल रुमचे पोलीस निरीक्षक बाकल, पोलीस उपनिरीक्षक बोंदरे, सहायक पोलीस निरीक्षक विजय नाईक, पोलीस निरीक्षक साळवे, पोलीस उपनिरीक्षक मलकापुरे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सहायक पोलीस निरीक्षक विजय नाईक यांच्या पथकाने अपहरणकर्त्याला अटक करण्यात यश मिळविले. (जिल्हा प्रतिनिधी)
अन् ममतेचा बांध फुटला
पवनचे अपहरण झाल्यापासून सतत डोळ्यात आसवे घेऊन चिंता करण्याशिवाय काहीच हाती नव्हते. पवन कसा आहे, कुठे आहे, याचीही माहिती नाही. अपहरणकर्ता त्याला नीट खाऊ घालत आहे वा नाही हीच सतत चिंता. अशातच पवनची सुटका झाल्याची वार्ता ढगे कुटंबीयांना मिळताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पवनला एकदाचे डोळे भरुन केव्हा पाहतो, असे या कुटुंबीयांचे झाले होते. पोलीस पवनला घेऊन वर्धेत दाखल होताच त्याच्या आईने अश्रूंना वाट मोकळी केली. पोटच्या गोळ्याच्या विरहाचे दु:ख काय असते, या भावनिक क्षणाचा प्रत्यय या माय-लेकाच्या भेटीने उपस्थितांना आला.
पवनला अपहरणाची कल्पनाच नव्हती
पवन हा राहुलच्या अंगाखांद्यावर खेळायचा. राहुलनेही त्याला आपण तुझ्या आई-वडिलांना भेटण्याकरिता पंढरपूरला जात असल्याचे सांगितले. दरम्यान पवनची प्रत्येक इच्छा तो पूर्ण करीत होता. आपले अपहरण झाल्याची कल्पनाही आरोपीने पवनला येऊ दिली नाही.
दादाला मारू नका
अपहरणकर्त्या राहुलला अटक करताच त्याला पोलीसी हिसका दाखविला, तेव्हा ‘दादाला मारु नका’, अशा शब्दात पवन पोलिसांची विनवणी करीत होता. हे बघून पोलिसांनाही त्याची दया येत होती.
अपहरणासारख्या गुन्ह्याचीही पार्श्वभूमी
राहुल शेंडे (२५) रा.बावणे ले-आऊट जिजाबाई वॉर्ड वरोरा जि. चंद्रपूर हा इयत्ता बारावीत नापास झाला होता. अशातच त्याने वरोऱ्यातील व्यवहारे आडनावाच्या एका गृहस्थाच्या मुलाचे अपहरण करुन २० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. पोलिसांनी वर्धेतील केळकर वाडीतून त्या मुलाची त्याच्या तावडीतून सुटका केल्याची पोलिसात नोंद आहे.
एकेक गुन्हे करीत असताना तो नांदेड येथे एका घरी भाड्याने राहात होता. दरम्यान त्याने शेजारच्या एका मुलाशी गट्टी करुन त्याचेच अपहरण केले. अटक होण्याची भीती लक्षात येताच तो त्या मुलाला माहुरला सोडून पसार झाला होता.याप्रकरणी त्याच्याविरुद्ध नांदेड येथे गुन्हा दाखल आहे.

Web Title: Kidnappers Rahul Shende notorious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.