किडनीदात्याची माहिती आॅनलाइन

By Admin | Updated: August 17, 2016 04:14 IST2016-08-17T04:14:07+5:302016-08-17T04:14:07+5:30

मूत्रपिंड प्रत्यारोपणाची प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत आणि पारदर्शक होण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेनुसार घेण्यात आला

Kidnadata Information Online | किडनीदात्याची माहिती आॅनलाइन

किडनीदात्याची माहिती आॅनलाइन

मुंबई : मूत्रपिंड प्रत्यारोपणाची प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत आणि पारदर्शक होण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेनुसार घेण्यात आला असून ही समिती यासंदर्भात १५ दिवसांत कार्यपद्धती तयार करेल. मूत्रपिंड दात्याची माहिती आधार कार्डशी संलग्न करून आॅनलाइन माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज पत्रकारांना दिली.
किडनी प्रत्यारोपण रॅकेटच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील युरोलॉजीस्ट आणि नेफ्रॉलॉजीस्ट संघटनांच्या सदस्यांनी भेट घेऊन व्यथा मांडली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक झाली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण अधिक सुलभ होण्यासाठी नियमावली करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे ठरले. त्यानुसार आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, वैद्यकीय शिक्षण, विधी व न्याय, न्युरोलॉजीस्ट, नेफ्रॉलॉजीस्ट आदी क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन करून १५ दिवसांत नियमावली तयार करण्यात येणार आहे.
मूत्रपिंडदात्याची ओळख पटविण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येत असून त्या माध्यमातून दात्याची माहिती आधार कार्डशी संलग्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही प्रक्रिया आॅनलाइन करून त्याद्वारे मूत्रपिंडदात्याची माहिती, मूत्रपिंड स्वीकारणाऱ्या रुग्णाची माहिती, शस्त्रक्रिया झाल्याची माहिती या सॉफ्टवेअरमध्ये संकलित होईल व ती माहिती आॅनलाइन करण्यात येईल. या प्रक्रियेच्या माध्यमातून मूत्रपिंड प्रत्यारोपणामध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. रुग्णालयांकडून शस्त्रक्रियोत्तर माहिती घेऊन मूत्रपिंडदात्याची शस्त्रक्रियेनंतर तपासणी करून खात्री करण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Kidnadata Information Online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.