घुमानवारीत साहित्यप्रेमींसाठी ‘खवय्येगिरी’
By Admin | Updated: March 24, 2015 02:03 IST2015-03-24T02:03:35+5:302015-03-24T02:03:35+5:30
८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीतर्फे साहित्यप्रेमींसाठी घुमानवारीत ‘खवय्येगिरी’चा बेत आखण्यात आला आहे.

घुमानवारीत साहित्यप्रेमींसाठी ‘खवय्येगिरी’
मुंबई : ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीतर्फे साहित्यप्रेमींसाठी घुमानवारीत ‘खवय्येगिरी’चा बेत आखण्यात आला आहे. येत्या १ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता पुणे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या संतश्रेष्ठ नामदेव एक्स्प्रेसमधे दोन दिवसांच्या प्रवासात खवय्यांसाठी अस्सल मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल असेल, असे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी सांगितले.
रेल्वे प्रवासातील सकाळचा न्याहारीपासून ते रात्रीचे जेवण यात केशर शिरा, मिसळ पाव यापासून ते केशरी जिलेबी, श्रीखंड, गुलाबजाम, पालकाची भजी, मूग भजी, अळूची पातळ भाजी, मसाला भात, भाजलेले पापड, पुरणाची आमटी आणि मसाले भात अशी अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची मेजवानी असणार आहे. तर न्याहारीसाठीही उपवासाची खिचडी, थालीपीठ-लोणी, साबुदाणा वडा असे पक्वान असणार आहेत. संमेलनातील साहित्य मेनूबरोबर हा खाद्यपदार्थांचा हा मेनूही साहित्यप्रेमींना आवडेल, असा विश्वास देसडला यांनी व्यक्त केला.
खुद्द साहित्य संमेलनात सुद्धा रव्याचे लाडू, बालूशाही, खोबरा पाक, बेसनाचे लाडू, ड्रायफ्रूट स्वीट, सोनपापडी, सुजी हलवा, काजू कतली, दुधी हलवा, मोहनथाळ तसेच मधुमेही साहित्यप्रेमींसाठी शर्करामुक्त गोड पदार्थही ठेवण्यात आले आहेत, असेही देसडला यांनी स्पष्ट केले.
बापट यांना मान!
संतश्रेष्ठ नामदेव एक्स्प्रेस या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्याचा मान पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना देण्यात आला आहे. त्यानंतर ही गाडी पुणे, दौंड, अहमदनगर, मनमाड असा प्रवास करीत पंजाब (बियान)ला पोहोचेल, तेथून घुमानला सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.