खुटारी शाळेतील विद्यार्थी झाले स्मार्ट
By Admin | Updated: April 8, 2017 03:42 IST2017-04-08T03:42:04+5:302017-04-08T03:42:04+5:30
रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा दिवसेंदिवस हायटेक होत असून आता त्यात खुटारी येथील शाळेची भर पडली आहे

खुटारी शाळेतील विद्यार्थी झाले स्मार्ट
वैभव गायकर,
पनवेल- रायगड जिल्हा परिषदेच्या शाळा दिवसेंदिवस हायटेक होत असून आता त्यात खुटारी येथील शाळेची भर पडली आहे. ही शाळा शंभर टक्के इंटरअॅॅक्टिव्ह स्मार्ट झाली आहे. तालुक्यातील ही तिसरी स्मार्ट शाळा असून आमदार प्रशांत ठाकूर आणि पंचायत समितीचे माजी सभापती हरेश केणी यांच्या हस्ते सोमवारी या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. खुटारी येथील पहिली ते पाचवीचे विद्यार्थी आता फळा आणि खडूविरहित शिक्षणाचे धडे घेवू लागले आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा पट कायम ठेवण्यासाठी शिक्षण विभाग, शाळा आणि शिक्षकांना कसरत करावी लागत आहे. परंतु गेल्या दोन अडीच वर्षांपासून गळती थांबली आहेच, शिवाय खासगी शाळांपेक्षा पालकांकडून मराठी शाळांना प्राधान्य देण्यात येत आहे. शैक्षणिक दर्जा सुधारल्यामुळे आज खुटारी गावातील बहुतांश विद्यार्थी खुटारीतील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी मारुती पाटील व उपशिक्षक संजय वसंत खटके यांचे प्रयत्न आणि ग्रामस्थांच्या मदतीने ही शाळा हायटेक झाली आहे.
बालभारतीच्या माध्यमातून पुस्तकांच्या पीडीएफ फाईल स्टोअर केल्यामुळे मुलांना त्या संदर्भातील व्हिडीओच्या माध्यमातून चांगल्या पध्दतीने धडे देता येऊ लागले आहेत. मुलांना सहज, सोप्या भाषेत हसत खेळत शिक्षणाचे धडे गिरवत आहे. वेगवेगळ्या टूल्सच्या माध्यमातून स्मार्ट डिजिटल बोर्डचा वापर विद्यार्थ्यांना करता येणार आहे. यामध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंगची सोय असल्याने दिवसभरात शिक्षकांनी काय शिकवले आणि विद्यार्थी काय शिकले याची माहिती मिळते. ती पालक तसेच शिक्षण विभागाला पाहता येवू शकते. शाळेतील उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष अरुण भगत, माजी उपसभापती रामदास पाटील उपस्थित होते.
पनवेल तालुक्यातील पहिली संपूर्ण इंटरअॅक्टिव स्मार्ट स्कूल खुटारीत सुरू झाली आहे. मराठी डिजिटल स्कूलमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल. आगामी काळात इंग्रजी शाळेतील विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेला नक्की पसंती देतील.
- प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल
प्रतिकूल परिस्थिती अनुकूल बनवली
खुटारी शाळेत उपशिक्षक संजय वसंत खटके काम करीत आहेत. एका पायाने विकलांग असलेले खटके यांनी आपल्या अपंगत्वावर मात करीत खुटारीची शाळा स्मार्ट केली. त्याकरिता त्यांनी प्रतिकूल परिस्थिती अनुकूल केली. मन आणि मतभेद दूर करून शैक्षणिक कार्याकरिता ग्रामस्थांना एकत्रित केले आणि येथील शाळेचा कायापालट केला.
ग्रामस्थांची मदत
माजी सरपंच नंदकुमार चंद्रकांत म्हात्रे, रविकांत, विलास म्हात्रे यांच्यासह खुटारी ग्रामस्थांनी या उपक्र माकरिता शिक्षकांना मदतीचा हात दिला. त्याचबरोबर गटविकास अधिकारी नवनाथ साबळे, केंद्रप्रमुख गीते यांनी प्रोत्साहन दिले.