राज्यातील खरीप पिके धोक्यात!

By Admin | Updated: August 22, 2014 00:52 IST2014-08-22T00:52:36+5:302014-08-22T00:52:56+5:30

शेतकरी आर्थिक संकटात : पावसाची दडी; सोयाबीन, कापसाने टाकली मान

Kharif crops in the danger of the state! | राज्यातील खरीप पिके धोक्यात!

राज्यातील खरीप पिके धोक्यात!

अकोला: पावसाने दडी मारल्याने राज्यातील खरिपातील पिके धोक्यात आली असून, सोयाबीन आणि कापसासह सर्वच नगदी पिकांनी माना टाकल्या आहेत. याशिवाय राज्यात जवळपास ४५ लाख हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या असून, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
यंदा पावसाला दीड महिना उशिराने सुरुवात झाली, त्याही परिस्थितीत शेतकर्‍यांनी खरिपाची पेरणी केली. पेरणीनंतर पावसाने दडी मारली. एक महिन्यापासून पाऊस नसल्याने राज्यातील सव्वा कोटी हेक्टरवरील खरीप पिके धोक्यात आली आहेत. विदर्भ, मराठवाडा, खान्देशात कापसाचे पीक जवळपास ४0 लाख हेक्टरवर घेतले जाते; परंतु पाऊसच नसल्याने बहुतांश भागातील पिकाने मान टाकली असून, विशेषत: मराठवाड्यातील कापूस हातचा गेल्यात जमा आहे. विदर्भ, खान्देश, पश्‍चिम महाराष्ट्रातही तीच अवस्था आहे. राज्यातील जवळपास १ कोटी ४0 लाख हेक्टरपैकी ४९ लाख हेक्टर क्षेत्र विदर्भात आहे. त्यात १३ लाख हेक्टरवर धान, १५ लाख हेक्टरवर कापूस, १७ लाख हेक्टरवर सोयाबीन तर उर्वरित क्षेत्रावर गळीत व कडधान्य पिके घेतली जातात. यंदा ही सर्वच पिके पावसाअभावी धोक्यात आली आहेत. विदर्भात एकूण क्षेत्राच्या जवळपास ४ टक्के क्षेत्रावर सिंचन केले जाते. सर्वाधिक सिंचन हे विहिरी व तळ्यांच्या माध्यमातून होत असते. त्यापैकी सर्वाधिक तलाव पूर्व विदर्भात आहेत; मात्र पश्‍चिम विदर्भातील तलावांमध्ये यंदा पाणीच नाही. त्यामुळे शेतकरी चोहोबाजूंनी कोंडीत सापडला आहे. खरिपाची पिके हातची जाण्याच्या मार्गावर असल्याने, राज्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने खरीप व अर्धरबी पिकाचे नव्याने नियोजन केले आहे. त्यासाठी अर्धरब्बी आणि तेलबियांसह तूर या डाळवर्गीय पिकांच्या लागवडीची शिफारस करण्यात आली आहे; पावसाचा थांगपत्ता नसल्याने अर्धरबी पिकांबाबतीतही शेतकर्‍यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्वच तालुके शासनाने टंचाईग्रस्त जाहीर केले आहेत. त्यामुळे या विभागातील पिकांची स्थिती किती वाईट आहे, हे लक्षात येते. कापसासह सर्वच पिके हातची गेली आहेत, असे परभणी येथील कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के.पी. गोरे यांनी सांगितले.

Web Title: Kharif crops in the danger of the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.