खारेगाव टोल नाका बंद होणार
By Admin | Updated: May 6, 2017 04:05 IST2017-05-06T04:05:06+5:302017-05-06T04:05:06+5:30
राज्यातील पहिला टोल नाका अशी ओळख असलेला ठाण्यातील खारेगाव टोल नाका अखेर येत्या १३ मेपासून कायमस्वरूपी बंद करण्यात

खारेगाव टोल नाका बंद होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्यातील पहिला टोल नाका अशी ओळख असलेला ठाण्यातील खारेगाव टोल नाका अखेर येत्या १३ मेपासून कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावरील या रस्त्याच्या उभारणी आणि देखभालीचा खर्च वसूल झाल्याचे आयआरबी कंपनीने म्हटले असून, त्यामुळे सरकारने हा टोल नाका बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वाहनचालकांची टोलच्या कटकटीतून सुटका होणार आहे.
मुंबईहून नाशिककडे जाताना ठाण्यानंतर लागणारा पहिला टोल नाका म्हणजे खारेगावचा टोल नाका. येथून दिवसाला हजारो वाहने ये-जा करतात. त्यातून आयआरबी कंपनीला दिवसाला लाखो रुपयांचा टोल मिळतो. १९९८ साली हा टोल नाका उभारण्यात आला होता. तेव्हापासून रस्त्याची उभारणी आणि देखभालीच्या खर्चापोटी १८० कोटी रु पये कंपनीला वसूल करायचे होते.
मात्र, प्रत्यक्षात कंपनीने यापेक्षा कितीतरी पटीने जास्त वसुली केल्याचा दावा ठाण्यात राहणारे सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास तावडे यांनी केला आहे. याबाबत, ते अनेक वर्षांपासून टोल नाका बंद करण्यासाठी पाठपुरावा करत होते.
टोल नाका बंद होणार म्हटल्यानंतर वाहनचालकांचीही महिन्याला हजारो रुपयांची बचत होणार आहे. त्यामुळे साहजिकच वाहनचालकांनी या गोष्टीवर आनंद व्यक्त केला आहे.
चालकांना दिलासा
खारेगाव हा राज्यातील पहिलाच टोल नाका आहे. टोलवसुली बंद झाल्यामुळे १३ मे पासून वाहनचालकांना टोल भरण्याची गरज नाही.
1998
साली राज्यातील हा टोल नाका सर्वप्रथम उभारण्यात
आला होता.
180
कोटी रु पये कंपनीला वसूल करायचे होते. वसुली झाल्याने टोलबंदी करण्यात येईल.