खडसेंच्या ‘मोबाइल बिल’ वक्तव्याची चौकशी होणार
By Admin | Updated: February 26, 2015 06:01 IST2015-02-26T06:01:43+5:302015-02-26T06:01:43+5:30
शेतकऱ्यांच्या वीज बिलावरून वादग्रस्त वक्तव्य करणारे महसूलमंत्री एकनाथ खडसे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत

खडसेंच्या ‘मोबाइल बिल’ वक्तव्याची चौकशी होणार
जाफराबाद (जि. जालना) : शेतकऱ्यांच्या वीज बिलावरून वादग्रस्त वक्तव्य करणारे महसूलमंत्री एकनाथ खडसे अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. जाफराबाद कोर्टात याप्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर पोलिसांना अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शेतकरी हजार रुपयांचे मोबाइल बील भरतात. पण, वीजबील भरत नाहीत, या खडसे यांच्या वक्तव्यावर पोलिसांनी अहवाल सादर करावा, असे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सचिन तट यांनी मंगळवारी दिले. अकोला दौऱ्यादरम्यान २२ नोव्हेंबर २०१४ रोजी खडसे यांनी हे वादग्रस्त विधान केले होते. खडसेंनी शेतकऱ्यांचा अवमान केला असून त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांच्या बदनामीप्रकरणी फिर्याद नोंदविण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस सुरेश गवळी यांनी याचिकेद्वारे केली आहे. त्यावर २४ फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीत खडसेंच्या वक्तव्याचे रेकार्डिंग सादर करण्यात आले. मात्र साक्षीदारांची कुठलीही चौकशी झालेली नाही. त्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले. (प्रतिनिधी)