खड्डे नागरिकांचीही जबाबदारी -महापौर
By Admin | Updated: July 13, 2016 04:19 IST2016-07-13T04:19:51+5:302016-07-13T04:19:51+5:30
अनेक वादग्रस्त विधान करून गोत्यात आलेल्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी आता खड्डे ही नागरिकांचीही जबाबदारी आहे, अशी मुक्ताफळे उधळत आधीच खड्ड्यांमुळे त्रासलेल्या मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

खड्डे नागरिकांचीही जबाबदारी -महापौर
मुंबई : अनेक वादग्रस्त विधान करून गोत्यात आलेल्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी आता खड्डे ही नागरिकांचीही जबाबदारी आहे, अशी मुक्ताफळे उधळत आधीच खड्ड्यांमुळे त्रासलेल्या मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी मुंबईत ६६ खड्डे असल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वातावरण तापले़ विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत मुंबईतील खड्डे मोजण्याची मोहीमच सुरू केली़ मात्र विरोधी पक्षांऐवजी सध्या मित्रपक्षच शिवसेनेसाठी डोकेदुखीचे कारण ठरले आहे़ शिवसेनेला मित्रपक्ष भाजपानेच आज खड्ड्यांचे दर्शन घडविले़
खड्ड्यांवरून वातावरण तापत असताना त्याला समर्पक उत्तर देण्याऐवजी महापौर स्नेहल आंबेकर यांनी खड्डे ही नागरिकांचीही जबाबदारी आहे़ तक्रार करण्यापूर्वी तो रस्ता कोणाचा आहे, याची माहिती असावी, असे वादग्रस्त विधान करत त्यांनी अधिकाऱ्यांना रस्ता कोणाचा त्या यंत्रणेचे नावही त्या ठिकाणी लिहिण्यास सांगितले़ तसेच भाजपा नेत्यांनी नोंदविलेल्या निरीक्षणांची दखल घेणार, असा बचाव करीत आंबेकर यांनी युतीतील वादावर पांघरुण घातले़ (प्रतिनिधी)
पायधुनी विभागात काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका वकारुन्नीसा अन्सारी या आज त्यांच्या विभागातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी गेल्या असता रहमतुल्ला मार्गावरील एका खड्ड्यात त्यांचा पाय गेला व त्या पडल्या़ यात त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे़ त्यांच्यावर जे़जे़ रुग्णालयात उपचार करण्यात आले़
काँग्रेसने आता आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पॉटहोल दिंडी काढण्याचा इशारा दिला आहे़ त्यानुसार १५ जुलै रोजी ११ वाजता फॅशन स्ट्रीट ते महापालिका मुख्यालय असा दिंडीचा प्रवास असेल.