खडसे-पवार संघर्ष
By Admin | Updated: March 31, 2015 02:56 IST2015-03-31T02:56:25+5:302015-03-31T02:56:25+5:30
धनगर समाजाच्या आरक्षणावरून आज महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात विधानसभेत जोरदार खडाजं

खडसे-पवार संघर्ष
मुंबई : धनगर समाजाच्या आरक्षणावरून आज महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात विधानसभेत जोरदार खडाजंगी झाली. आघाडी सरकारच्या काळात आपल्या अध्यक्षतेखाली कुठलीही समिती नेमलेली नसताना खडसे यांनी खोटी माहिती देऊन आपली बदनामी केली, असा आक्षेप पवार यांनी नोंदविला. तर समिती नव्हे, बैठकीत विरोध करण्यात आला होता, असे खडसे यांनी खुलासा केला.
२७ एप्रिल रोजी विधान परिषदेत निवेदन करताना महसूलमंत्री खडसे यांनी आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने धनगर जातीस अनुसूचित जमातीचे फायदे देण्यास विरोध करणारा अहवाल दिला होता, असा गौप्यस्फोट करून एकच खळबळ उडवून दिली होती. सोमवारी हा मुद्दा अजित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. ते म्हणाले, की आघाडी सरकारच्या काळात आपल्या अध्यक्षतेखाली धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कोणतीही समिती नियुक्ती करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्या समितीने कोणत्याही प्रकारचा अहवाल देण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र खडसे यांनी सभागृहात चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. त्यावर खडसे म्हणाले, की जर आपण समिती म्हणालो असू तर तो शब्द वापस घेऊ. पण अजित पवारांच्या दालनात झालेल्या बैठकीत आरक्षणाला विरोध करण्याचा निर्णय झाला होता. त्याचे मिनिट्स आपल्याकडे आहेत, असा दावा खडसे यांनी केला. (विशेष प्रतिनिधी)