खडसेंना मिळाले अजित पवारांचे दालन
By Admin | Updated: November 8, 2014 03:52 IST2014-11-08T03:52:07+5:302014-11-08T03:52:07+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांसाठीच्या दालनांचे वाटप केले असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुख्य इमारतीमधील सहाव्या मजल्यावरील दालन

खडसेंना मिळाले अजित पवारांचे दालन
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांसाठीच्या दालनांचे वाटप केले असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुख्य इमारतीमधील सहाव्या मजल्यावरील दालन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना दिले आहे.
गृह खात्यासाठी आग्रही राहिलेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना ते खाते काही मिळाले नाही, पण माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे दालन मात्र मिळाले आहे. तर पाचव्या मजल्यावरील नव्याने उभारलेले सुसज्ज असे हर्षवर्धन पाटील यांचे दालन वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे. त्यांच्या शेजारचे दालन सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. उद्योगमंत्री प्रकाश महेता यांना सहाव्या मजल्यावरच मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दालन दिले आहे. चौथ्या मजल्यावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना दालन दिले गेले आहे. आदिवासी मंत्री विष्णू रामा सवरा यांना मंत्रालय विस्तार इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरचे दालन दिले आहे. तर राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना विस्तारित इमारतीतील पाचव्या मजल्यावरील दालन क्रमांक ५०२ दिले आहे. राज्यमंत्री विद्या ठाकूर यांना विस्तारित इमारतीतील पहिल्याच मजल्यावरील ११५ व ११७ अशा दोन दालनांचे कार्यालय दिले आहे. (विशेष प्रतिनिधी)