फडणवीस-ठाकरेंमध्ये खडाजंगी
By Admin | Updated: October 31, 2015 02:42 IST2015-10-31T02:42:55+5:302015-10-31T02:42:55+5:30
राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारची वर्षपूर्ती होत असतानाच कल्याण-डोंबिवली महापालिकेतील प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

फडणवीस-ठाकरेंमध्ये खडाजंगी
ठाणे : राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारची वर्षपूर्ती होत असतानाच कल्याण-डोंबिवली महापालिकेतील प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परस्परांवर शेलक्या शब्दांत केलेल्या टीकेमुळे दोन्ही पक्षांतील (मैत्रीपूर्ण) संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. उद्धव यांनी सरकारला ‘हद्दपार’ करण्याची धमकी दिली, तर आमच्याही कार्यकर्त्यांनी बांगड्या भरलेल्या नाहीत, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले.
महापालिका निवडणुकीची सांगता अनेक नाट्यपूर्ण घडामोडींनी झाली. एकनाथ शिंदे यांनी भर सभेत आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा उद्धव यांच्याकडे देऊ केला. तो स्वीकारला गेला नाही, पण त्यामुळे उभय पक्षांतील कटुतेत भर पडली. कल्याण येथे सांगता सभेत बोलताना ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना वाघाच्या पंजाची आठवण करून देताना भाजपाचा माज उतरवण्याची भाषा केली. पोलिसांनी भाजपाची धुणी-भांडी करू नयेत. शिवसैनिकांना तडीपार कराल, तर आम्ही सरकारला तडीपार करू, असा इशाराही उद्धव यांनी दिला. तर कल्याण येथेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाघाच्या तोंडातील दात मोजण्याची आमची जात असल्याचे सांगत शिवसेनेचे पुरते वस्त्रहरण केले. निवडणुकीपुरते हिंदुत्वावर बोलून आम्हाला शिकवण्याच्या फंदात पडू नका, असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले. (प्रतिनिधी)
भाजपा कार्यकर्त्याचं अपहरण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न होतो. ही कोणाची संस्कृती आहे, असा सवाल करत शिवसेनेच्या या दहशतवादाविरुद्ध मी स्वत: निवडणूक आयोगाकडे तक्रार करेन, असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.
महापालिकांमधील गोल्डन गँग, बांधकाम क्षेत्रातील भ्रष्टाचार या मुद्द्यांवर आपल्या प्रचारात जोर दिला होता. ठाण्यातील सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील लोकप्रतिनिधींच्या सहभागाच्या पार्श्वभूमीवर प्रचारातील हे मुद्दे प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.
आम्हाला कसला वाघाचा पंजा दाखवताय? वाघाच्या तोंडातील दात मोजण्याची आमची जात आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री