केईएममधील तरुणाची आत्महत्या नैराश्यातून
By Admin | Updated: September 24, 2014 05:28 IST2014-09-24T05:28:03+5:302014-09-24T05:28:03+5:30
परळ येथील केईएम रुग्णालयात सोमवारी सकाळी एका अनोळखी तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता.

केईएममधील तरुणाची आत्महत्या नैराश्यातून
मुंबई : परळ येथील केईएम रुग्णालयात सोमवारी सकाळी एका अनोळखी तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. या तरुणाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. दर्शन बनसोडे (२६) असे त्याचे नाव असून, तो रुग्णालयातील एका रुग्णाचाच नातेवाईक असल्याचे भोईवाडा पोलिसांनी सांगितले.
केईएम रुग्णालयात रविवारी येथील ओपीडी विभाग बंद असल्याने सोमवारी नेहमीप्रमाणे रुग्णालयातील कर्मचा-यांनी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ओपीडी सुरू केली. दरम्यान, येथील मानसोपचार विभागात कर्मचाऱ्यांना एक २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. कर्मचाऱ्यांनी ही बाब अधिकाऱ्यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी ही माहिती भोईवाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासात या तरुणाने लाइटच्या वायरने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना होता.
हा अपघातदेखील असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत होती. भोईवाडा पोलिसांनी घटनेची नोंद करीत तपास सुरू केला असता, रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी या तरुणाला ओळखले. गेल्या महिनाभरापासून हा तरुण त्याच्या आईसोबत या रुग्णालयात होता. मूळचा नांदेड येथील राहणारा दर्शन त्याच्या आईला घेऊन केईएम रुग्णालयात आला होता. त्याच्या आईला अर्धांगवायू असल्याने तो महिनाभरापासून रुग्णालय परिसरातच राहायचा. नोकरी नसल्याने आर्थिक परिस्थितीदेखील बेताची असल्याने अनेक दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली होता. यातूनच त्याने ही आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)