लुटारूंनी केली चेनपुलिंग
By Admin | Updated: June 30, 2014 00:39 IST2014-06-30T00:39:56+5:302014-06-30T00:39:56+5:30
चंद्रपूरवरून चेन्नई-लखनौ गाडीत तोंडाला दुपट्टे बांधून लूटमार करण्याच्या उद्देशाने गाडीत चढलेल्या ५ ते ६ आरोपींमुळे या गाडीत एकच खळबळ उडाली. दरम्यान प्रवाशांनी गाडीतील तिकीट तपासनीसाला याची

लुटारूंनी केली चेनपुलिंग
चेन्नई-लखनौएक्स्प्रेसमधील घटना : नक्षलग्रस्त भाग असल्याने प्रवासी धास्तावले
नागपूर : चंद्रपूरवरून चेन्नई-लखनौ गाडीत तोंडाला दुपट्टे बांधून लूटमार करण्याच्या उद्देशाने गाडीत चढलेल्या ५ ते ६ आरोपींमुळे या गाडीत एकच खळबळ उडाली. दरम्यान प्रवाशांनी गाडीतील तिकीट तपासनीसाला याची सूचना दिली. परंतू तडालीजवळ हे आरोपी चेनपुलिंग करून गाडीतून उतरले. तडाली हा नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे चेनपुलिंग करून उतरलेले आरोपी लूटमार करण्याच्या उद्देशाने गाडीत चढले की कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
रेल्वेगाडी क्रमांक १६०९३ मद्रास-लखनौ एक्स्प्रेसमध्ये चंद्रपूरवरून ५ ते ६ जण या गाडीत चढले. त्यांच्या हालचालींवर गाडीतील प्रवाशांना शंका आली. त्यांनी गाडीतील टीसीला याबाबत सूचना दिली. टीसीने रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. नियंत्रण कक्षाने रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांना सावधगिरीच्या सूचना दिल्या. त्यानंतर गाडीतील प्रवाशांना आपल्यावर शंका आल्याची बाब या आरोपींना कळली. त्यामुळे तडालीजवळ आरोपींनी या गाडीचे चेनपुलिंग केले आणि कुठलीही लूटमार न करता ते गाडीखाली उतरून पसार झाले. तडाली ते नागपूर रेल्वेस्थानक येईपर्यंत या गाडीतील प्रवाशांनी भीतीच्या सावटाखाली प्रवास केला. नागपूर रेल्वेस्थानकावर ही गाडी रात्री १.५० वाजता येते. परंतू या घटनेमुळे ही गाडी तब्बल ४० मिनिटे उशिरा आली. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर येताच लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाने श्वानपथक, बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या सहकार्याने या गाडीची कसून तपासणी केली. परंतू पोलिसांच्या हाती काहीच सुगावा लागला नाही. चंद्रपूरवरून चढलेल्या आरोपींनी तोंडाला दुपट्टा बांधला होता. (प्रतिनिधी)