मी दिलेला शब्द पाळतो

By Admin | Updated: May 9, 2015 01:35 IST2015-05-09T01:35:02+5:302015-05-09T01:35:02+5:30

‘‘मैंने एक बार कमिटमेंट (शब्द) दी तो वो पुरी करता हुँ’’ अशा शब्दात काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी आपल्या भिवंडी

Keeping the word I gave you | मी दिलेला शब्द पाळतो

मी दिलेला शब्द पाळतो

भिवंडी : ‘‘मैंने एक बार कमिटमेंट (शब्द) दी तो वो पुरी करता हुँ’’ अशा शब्दात काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी आपल्या भिवंडी न्यायालयातील पेशीचे स्पष्टीकरण दिले. या न्यायालयातील या खटल्याच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने ते शुक्रवारी येथे येणार नाहीत असे वातावरण निर्माण झाले होते. मात्र शुक्रवारी आपण उपस्थित राहू असा जो शब्द त्यांनी न्यायालयाला आधिच्या सुनावणीच्या वेळी वकिलांमार्फत दिला होता. तो पाळण्यासाठी राहुल आले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केल्याप्रकरणी भिवंडी न्यायालयात दाखल केलेल्या मानहानी खटल्याची सुनावणी शुक्रवारी १०.३० वाजता येथील न्यायालयात होणार होती. त्यासाठी ते हजर झाले ही बातमी शहरात पसरताच शहरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोर्टाबाहेर गर्दी केली होती.
महात्मा गांधी यांची हत्या आरएसएसने केल्याचा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकांपूर्वी तालुक्यातील सोनाळे गावात ६ मार्च रोजी झालेल्या जाहीर सभेत केला होता. त्यामुळे बदनामी झाल्याचा आरोप करून आरएसएसचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी राहुल गांधीविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. याप्रकरणी गेल्यावेळी झालेल्या सुनावणीवेळी ते उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या नावे समन्स काढले.
त्याचवेळी वकिलामार्फत राहुल यांनी आपण पुढील सुनावणीस उपस्थित राहू असा शब्द दिला होता. त्याविरोधात राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात भिवंडी कोर्टातील हा दावा व समन्स रद्द करण्याची मागणी केली. मात्र, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली, तेव्हा वकिलांनी भिवंडी कोर्टात ते ८ मे २०१५ रोजी हजर राहतील, असे लिहून दिले होते. दरम्यान, त्यांनी याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असता न्यायमूर्ती दीपक मिश्रा व न्यायमूर्ती पी.सी. पंत यांच्या खंडपीठाने पुढील सुनावणीपर्यंत भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीला स्थगिती दिली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश भिवंडी कोर्टात सादर करण्यासाठी उपस्थित झाले. सकाळी १०.३० वाजता त्यांनी स्वत: न्यायाधीश डी.पी. काळे यांच्या कोर्टात हजर राहून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत त्यांना दिली.
न्यायाधीश काळे यांनी राहुल यांना हजर राहण्यासाठी ३० सप्टेंबर २०१५ ही तारीख दिली. या वेळी राहुल गांधीच्या वतीने कोर्टाचे कामकाज वकील नारायण अय्यर यांनी पाहिले. तर, याचिकाकर्ते राजेश कुंटे यांच्या वतीने कोर्टाचे कामकाज गणेश धारगळकर यांनी पाहिले.
कोर्टातून बाहेर निघताच कोर्टाच्या आवारात मीडियाच्या प्रतिनिधींनी राहुल गांधी यांना अक्षरश: घेरून, सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले असताना भिवंडीत आपण हजर का झालात, असे विचारीत प्रश्नांचा भडीमार सुरू केला आणि पोलिसांनी जाणीवपूर्वक मीडियास लांब ठेवण्याचा प्रयत्न केला असता राहुल गांधी यांनी मीडियास एका बाजूला बोलवून महात्मा गांधींच्या विचारांची लढाई आम्ही सुरू ठेवली असून आम्ही कोर्टाचा सन्मान करतो, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Keeping the word I gave you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.