भाडेकरू ठेवताय ?
By Admin | Updated: February 4, 2015 00:55 IST2015-02-04T00:55:33+5:302015-02-04T00:55:33+5:30
देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेले नागपूर शहर, दहशतवाद्यांच्या, नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिले आहे. गेल्या काही वर्षात शहरातील राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. खून, चोरी, चेनस्नॅचिंग

भाडेकरू ठेवताय ?
पोलिसांना द्या माहिती : कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सतर्कता
नागपूर : देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेले नागपूर शहर, दहशतवाद्यांच्या, नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिले आहे. गेल्या काही वर्षात शहरातील राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. खून, चोरी, चेनस्नॅचिंग सारख्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नागपूर पोलीस सतर्कता बाळगत आहेत. बाहेरून येऊन येथे गैरकायदेशीर कृत्य करू नये, म्हणून पोलीस आयुक्तांनी शहरात भाडेकरू, पेर्इंगगेस्ट राहणाऱ्यांची सविस्तर माहिती घरमालकांकडून मागविली आहे. १ फेब्रुवारी ते ३१ मार्च पर्यंत घरमालकांनी सविस्तर माहिती संबंधित पोलीस ठाण्यात द्यायची आहे. भाडेकरूंची माहिती पोलिसांना न देणाऱ्या घरमालकांविरुद्ध भांदविच्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे. यासंदर्भातील आदेश पोलीस आयुक्तांनी काढले आहेत.
राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि चळवळीच्या दृष्टिकोनातून नागपूर शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुण्यानंतर शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल नागपूरकडे वाढला आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेशातील अनेकांचे रोजगारासाठी नागपुरात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे नागपूरच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.
शहराचाही त्याच गतीने विस्तार होत आहे. त्याचबरोबर गुन्ह्यांच्या घटनेतही वाढ होत आहे. आज जवळपास शहरात ४० टक्के लोक किरायाच्या घरात वास्तव्य करीत आहेत. शहरात गेल्या काही वर्षात घडलेल्या घटनांमध्ये असामाजिक तत्त्व घर भाड्याने घेताना आढळले आहे. चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांमध्ये बाहेरून आलेले युवक जास्त सक्रिय असल्याचे आढळले आहे. शहरालगतच्या भागात फ्लॅट भाड्याने घेऊन देहव्यवसाय होत असल्याचे पोलिसांच्या धाडसत्रात उघड झाले आहे. या सर्व घटना शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास घातक ठरत आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी भाडेकरूंची सविस्तर माहिती मागविली आहे. घरमालकांनी भाडेकरूबाबत संपूर्ण माहिती घेऊनच त्याला घर भाड्याने द्यावे, त्यांच्या फोटो आयडीसह संबंधित पोलीस ठाण्याला माहिती देणे आवश्यक आहे. मात्र घरमालकांकडून नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने पोलीस आयुक्तांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत.