केडीएमसीत सेना-भाजपात बिग फाइट?
By Admin | Updated: October 14, 2015 04:20 IST2015-10-14T04:20:33+5:302015-10-14T04:20:33+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी रीघ लागलेली असतानाच

केडीएमसीत सेना-भाजपात बिग फाइट?
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी इच्छुक उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी रीघ लागलेली असतानाच शिवसेना आणि भाजपाने स्वतंत्र अर्ज दाखल केल्याने या दोन पक्षांतच बिग फाइट रंगेल असे चित्र निर्माण झाले आहे.
युती संदर्भातील सर्व चर्चा फोल ठरल्याने शिवसेनेने सोमवारी रातोरात ए-बी फॉर्मचे वाटप केले, तर भाजपानेही कल्याणमध्ये तसेच काहींच्या घरी जाऊन त्याचे वाटप केले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे सात दिवस पितृपक्षात गेल्याने मंगळवारी अखेरच्या दिवशी घटस्थापनेच्या मुहूर्तावर सर्वच पक्षांतील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात बंडखोरी होण्याच्या भीतीने काँग्रेस वगळता सर्वांनाच यादी जाहीरपणे प्रसिद्ध न करता उमेदवारांच्या हाती गुपचूप एबी फॉर्म द्यावे लागले. दरम्यान, आपल्याला डावलल्याचे लक्षात येताच काहींनी अपक्ष उमेदवारी दाखल करून बंडखोरी केल्याचे दिसून आले.
तब्बल २२३३ अर्जांची विक्री झालेली असताना १२ केंद्रांवर सुमारे १०३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, उद्या बुधवारी अर्जांची छाननी होणार आहे. शुक्रवार माघारीचा दिवस असून, अंतिम यादी
१७ आॅक्टोबरला तयार केली जाणार आहे.
यात शिवसेना १२२, भाजपा १२२, मनसे ८८, काँगे्रस ५६, राष्ट्रवादी ४१, एमआयएमच्या ७ अर्जांचा समावेश आहे. २७ गावांतील संघर्ष समितीने बहिष्काराचे हत्यार मागे घेऊन भाजपाकडून अर्ज दाखल केले आहेत.
मंगळवारी अखेरच्या दिवशी उमेदवारांची निवडणूक केंद्रावर भाऊगर्दी होणार याअनुषंगाने चोख बंदोबस्त ठेवला होता. परंतु, सुव्यवस्था दृष्टीस पडली नाही. दुपारी ३ वाजेपर्यंतच उमेदवारी दाखल करण्याची वेळ असल्याने सकाळच्या टप्प्यातच उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची केंद्रावर गर्दी झाली होती. त्यांना केंद्राबाहेर पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून थोपवून धरले होते. उमेदवार आणि त्याचे दोन समर्थक वगळता अन्य कोणालाही केंद्रामध्ये प्रवेश दिला जात नव्हता. प्रमुख मार्गांवर असलेली निवडणूक कार्यालये, त्यातच सुरू झालेला नवरात्रौत्सव यामुळे शहरात गर्दीला उधाण आले होते. शिवाजी चौक, सहजानंद चौक, अहिल्याबाई चौक, शंकरराव चौक याठिकाणी वाहतूककोंडी झाल्याचे दिसून आले. निवडणूक केंद्र परिसरात झालेली गर्दी हटविण्यासाठी काहीठिकाणी पोलिसांना लाठीचा ही वापर करावा लागला. २७ गावांचा अपवाद वगळता इतरत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शांततेत पार पडली. दरम्यान एमआयएमदेखील निवडणूक रिंगणात उतरली असून त्यांनी कल्याण पश्चिम आणि पूर्व भागातील मुस्लिम बहुल सात प्रभागात उमेदवार उभे केले आहेत. शिवाय बसपा, रिपाइंसह इतर छोटेमोटे पक्षही रिंगणात आहेत.