आज केडीएमसी महापौरपदाची निवडणूक

By Admin | Updated: November 11, 2015 02:33 IST2015-11-11T02:33:59+5:302015-11-11T02:33:59+5:30

कल्याण-डोंबिवली महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक उद्या (बुधवारी) होत असून शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी तर भाजपाच्या विक्रांत

KDMC Mayor election today | आज केडीएमसी महापौरपदाची निवडणूक

आज केडीएमसी महापौरपदाची निवडणूक

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक उद्या (बुधवारी) होत असून शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी तर भाजपाच्या विक्रांत तरे अथवा विशाल पावशे यांची उपमहापौरपदी निवड होणे अपेक्षित आहे.
महापौर व उपमहापौरपदाकरिता शिवसेना आणि भाजपाकडून स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल झाले असले तरी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेऊन बहुमताच्या बळावर निवडणूक जिंकण्याचा युतीचा प्रयत्न असणार आहे.
शिवसेना व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत शिवसेनेला प्रथम महापौरपद देऊन भाजपाने उपमहापौरपद स्वीकारण्याचा निर्णय झालेला आहे. केडीएमसीच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीत शिवसेना- भाजपा हे राज्यातील सत्ताधारी पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले. ५२ जागांवर विजय मिळवून शिवसेना प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला तर त्याखालोखाल ४२ जागा मिळवणारा भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला. दोन्ही पक्ष आपापले महापौर बसवण्याकरिता रस्सीखेच करतील, अशी अपेक्षा होती. मात्र महापालिकेतील घोडेबाजार रोखण्याकरिता त्यांनी युतीचा निर्णय घेतल्याने ९ जागा मिळवणाऱ्या मनसेचे किंगमेकर होण्याचे स्वप्न हवेत विरले. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे ६, बसपाचा १ आणि ९ अपक्ष यांचेही सत्तेच्या वाट्याचे इरादे गारद झाले.
महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवारी दाखल करताना शिवसेना आणि भाजपाकडून अगोदर स्वतंत्र अर्ज दाखल झाले व नंतर युतीची घोषणा झाली. वाटाघाटीत पहिले महापौरपद शिवसेनेला मिळणार असल्याने राजेंद्र देवळेकर यांचा मार्ग सुकर झाला आहे. भाजपातर्फे महापौरपदाकरिता अर्ज दाखल करणारे राहुल दामले हे अर्ज मागे घेतील, अशी अपेक्षा आहे. भाजपाकडून उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करणारे विक्रांत तरे आणि विशाल पावशे यांच्यापैकी कोणाच्या गळात माळ पडते ते पाहणे औत्सुक्याचे आहे. (प्रतिनिधी)
ठाकरे येणार दुर्गादेवीच्या दर्शनाला
केडीएमसीत शिवसेनेचा महापौर निवडून आल्यास मी स्वत: दुर्गाडी देवीच्या दर्शनाला येईन, असा शब्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रचारादरम्यान कल्याणकरांना दिला होता. त्याप्रमाणे बुधवारी महापौरपदाच्या निवडणुकीच्या वेळी ते स्वत: जातीने उपस्थित राहणार असून, निकालानंतर नवनिर्वाचित महापौरांसोबत दुगार्डी येथे जाऊन दुर्गा देवीचे दर्शन घेणार आहेत. त्याचबरोबर ते डोंबिवलीतील आप्पा दातार चौकातील गणेशमंदिरात जाऊन गणपतीचेही दर्शन घेणार आहेत.

Web Title: KDMC Mayor election today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.