सरकारच्या जीवावर केडीएमसी उदार
By Admin | Updated: March 4, 2017 03:33 IST2017-03-04T03:33:58+5:302017-03-04T03:33:58+5:30
महत्त्वाकांक्षी योजनांसह पंतप्रधान आवास योजनांचा अंतर्भाव करत कल्याण-डोंबिवलीचा २०१७-१८ चा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर झाला

सरकारच्या जीवावर केडीएमसी उदार
कल्याण : स्मार्ट सिटी, अमृत योजना, स्वच्छ महाराष्ट्र अभियान, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान या महत्त्वाकांक्षी योजनांसह पंतप्रधान आवास योजनांचा अंतर्भाव करत कल्याण-डोंबिवलीचा २०१७-१८ चा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर झाला. सरकारी योजनांच्या अनुदानाच्या आधारे पालिकेने हे उड्डाण घेतले आहे.
उत्पन्नाचे, खासकरून मालमत्ताकराचे जाळे वाढवण्याचे पालिकेचे प्रयत्न असून त्यातून उत्पन्न वाढेल, असा विश्वास आयुक्त ई. रवींद्रन यांनी व्यक्त केला.
पालिकेच्या २०१७-१८ च्या या अर्थसंकल्पात १८०६ कोटी ६० लाख रुपये जमा आणि १८०६ कोटी ४९ लाख रुपये खर्चाच्या बाबींचा समावेश आहे. ११ लाखांची शिल्लक दाखवण्यात आली आहे. आयुक्त रवींद्रन यांनी स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांना तो सादर केला.
किरकोळ अपवाद वगळता जुन्याच उपक्रमांची उजळणी यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प १६०० कोटींचा होता. यंदा हा आकडा १८०० कोटींच्या आसपास पोहोचला आहे. सध्याच्याच उत्पन्नाच्या स्रोतांतून जास्त उत्पन्न मिळवण्याच्या योजना यंदाही पालिकेने हाती घेतल्या आहेत.