केडीएमसीकडे फेरीवाल्यांची नोंदच नाही
By Admin | Updated: August 24, 2016 03:35 IST2016-08-24T03:35:37+5:302016-08-24T03:35:37+5:30
फेरीवाले आणि त्यांच्याकडून वसूल होणारी बाजारफी, याची ताजी आकडेवारीच कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे नसल्याची बाब उघडकीस आली

केडीएमसीकडे फेरीवाल्यांची नोंदच नाही
डोंबिवली : डोंबिवलीत रस्त्यांवर बसणारे फेरीवाले आणि त्यांच्याकडून वसूल होणारी बाजारफी, याची ताजी आकडेवारीच कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे नसल्याची बाब उघडकीस आली आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनीच त्याचा पोलखोल करत महापालिकेच्या आॅनलाइन विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला. या विभागाकडे २०११ची आकडेवारी असून, त्यानुसार डोंबिवलीतील विविध रस्त्यांवर केवळ नाममात्रच फेरीवाले बसत असल्याची नोंद आहे.
‘लोकमत’ने ‘आॅन दी स्फॉट’द्वारे फेरीवाल्यांचे रस्त्यांवर, स्कायवॉकवर झालेले अतिक्रमण, वाढती दादागिरी, मारहाणीच्या घटना तसेच फेरीवाल्यांकडून होणारी हप्ते वसुली घडकीस आणली होती. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शनिवारी झालेल्या महासभेतही फेरीवाल्यांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. यावेळी म्हात्रे यांनी महापालिका प्रशासनाकडून मिळालेली २०११ मधील फेरीवाल्यांची आकडेवारी सादर करत महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त ई. रवींद्रन यांना उत्तर देण्यास भाग पाडले. त्यावर देवळेकर यांनी सारवासारव करत आपल्याकडून ती माहिती मागवून घेतली. पण अजूनही कोणतीच ठोस कार्यवाही केली नाही, असे म्हात्रे यांचे म्हणणे आहे.
शहरातील फेरीवाले आणि त्या तुलनेत महापालिकेला बाजारफीच्या रूपात मिळणारे उत्पन्न यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे महापालिकेचे प्रचंड नुकसान होत आहे. त्याची चौकशी व्हावी, पारदर्शी कारभार समोर आणा, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे. २०११ नंतर आता २०१६ पर्यंत त्या आकडेवारीत किती वाढ झाली, उत्पन्नात किती वाढले, हे स्पष्ट होत नसल्याने आकड्यांचाच फार मोठा घोळ असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. महापालिकेचे संबंधित अधिकारी-कर्मचारीच प्रशासनाला अपुरी माहिती देत धुळफेक करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.