केडीएमसीतील युती अपेक्षेप्रमाणे अभेद्य
By Admin | Updated: March 1, 2017 03:58 IST2017-03-01T03:58:21+5:302017-03-01T03:58:21+5:30
शिवसेना-भाजपा एकमेकांविरोधात लढले असले तरी केडीएमसीत युती अभेद्य असल्याचेच चित्र मंगळवारी दिसले.

केडीएमसीतील युती अपेक्षेप्रमाणे अभेद्य
कल्याण : मुंबई, ठाणे , उल्हासनगर महापालिकेच्या प्रचारात शिवसेना-भाजपा एकमेकांविरोधात लढले असले तरी केडीएमसीत युती अभेद्य असल्याचेच चित्र मंगळवारी दिसले. परिवहन सदस्यांच्या निवडणुकीत भाजपाला सहकार्य करून युती अभेद्य असल्याचे शिवसेनेने दाखवून दिले. मनसेच्या उमेदवाराला निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे आणि भाजपाचे प्रत्येकी तीन सदस्य निवडून आले आहेत.
परिवहनच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात शिवसेना, भाजपाचे प्रत्येकी तीन तर मनसेच्या एका सदस्याचा समावेश होता. मंगळवारी गुप्त मतदान पद्धतीने निवडणूक पार पडली. महापालिकेतील १२० नगरसेवकांपैकी ११५ नगरसेवकांनी मतदान केले. एका नगरसेवकाचे मते बाद झाले. प्रत्येक नगरसेवकाला सहा मते द्यायची होती. पक्षीय बलाबलानुसार शिवसेनेचे तीन सदस्य सहजपणे निवडून जाऊ शकत होते, परंतु भाजपाचा तिसरा सदस्य निवडून जाण्यासाठी त्यांना अतिरिक्त मतांची आवश्यकता होती. मुंबई, ठाण्यासह अन्य महापालिकांच्या निवडणुकीत झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपाला सहकार्य करते का? अशा शंका-कुशंका उपस्थित होत असताना केडीएमसीत प्रथम भांडून नंतर एकत्र आलेल्या शिवसेना-भाजपानी युती अभेद्य ठेवली. युती अभेद्य राहिल, असे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिले होते.
शिवसेनेच्या सहकार्यावर समितीवर भाजपाचा तिसरा सदस्य निवडला गेला. मतमोजणी सहा फेऱ्यांमध्ये पार पडली. यात शिवसेनेचे मनोज चौधरी, संजय पावशे, मधुकर यशवंतराव तर भाजपाचे प्रसाद माळी, संजय राणे आणि कल्पेश जोशी हे सहाजण समितीवर निवडून गेले. मनसेचे उमेदवार संदेश प्रभुदेसाई हे सातव्या क्रमांकावर फेकले गेल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या निवडणुकीतील विजयाकरिता राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सोमवारपासूनच केडीएमसीत ठाण मांडले होते. मनसेचे प्रदेश सरचिटणीस राजू पाटील हेही मंगळवारी महापालिकेत उपस्थित होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिवसेनेने त्यांची अतिरिक्त मते भाजपाला दिल्याचे राज्यमंत्री चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले. महापौर देवळेकर यांनीही श्रेष्ठी जो निर्णय देतील तो मान्य केला जाईल, असे सांगितले.
शिवसेनेने युती अभेद्य ठेवताना मनसेलाही सहकार्य केल्याचे त्यांना मिळालेल्या मतांवरून उघड झाले आहे. निवडून आलेल्या सदस्यांमध्ये शिवसेनेचे मनोज चौधरी यांना सर्वाधिक (१०४), दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपाचे संजय राणे यांना (१०२), तिसरा क्रमांक शिवसेनेचे संजय पावशे (१०१) मते, चौथा आणि पाचव्या क्रमांकावर भाजपाचे प्रसाद माळी आणि शिवसेनेचे मधुकर यशवंतराव (९८) तर सहाव्या क्रमांकावर भाजपाचे कल्पेश जोशी (९७) मतांनी विजयी झाले आहेत. (प्रतिनिधी)
>काँग्रेसने युतीला सहकार्य केल्याचा आरोप
विरोधी गटातील काँग्रेसचे चारही नगरसेवक निवडणुकीच्या वेळी अनुपस्थित राहीले तर राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांपैकी एकच उपस्थित होता. पाच नगरसेवक उपस्थित राहिले असते तर निकाल वेगळा लागला असता. काँग्रेसने अनुपस्थित राहून एकप्रकारे युतीला सहकार्य केल्याचा आरोप मनसेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी केला आहे.