काश्मीर: नाशिकच्या पर्यटकांच्या गाडीवर दगडफेक
By Admin | Updated: July 9, 2016 12:36 IST2016-07-09T11:09:25+5:302016-07-09T12:36:14+5:30
नाशिक येथून अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या बसवर काश्मीर मधील अनंतनाग येथे दगडफेक करण्यात आली.

काश्मीर: नाशिकच्या पर्यटकांच्या गाडीवर दगडफेक
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. ९ - नाशिक येथून अमरनाथ यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या बसवर काश्मीर मधील अनंतनाग येथे दगडफेक करण्यात आली. काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांनी कारवाई करून हिजबुल मुजाहिद्दीनच्या म्होरक्यासह तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर खो-यात तणावपूर्ण वातावरण असून त्याच पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्राही तूर्तास स्थगित करण्यात आली. शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात दगडफेक आणि जाळपोळ सुरु झाली असून त्याचा फटका पर्यटकांनाही बसला. नाशिक येथून चार बसमधून १४० भाविक अमरनाथ यात्रेसाठी गेले होते, मात्र तेथून परत येत असताना काही दंगेखोरांनी त्यांच्या बसेस सोखत त्यावर दडगफेक केली. त्यामध्ये दोन बसच्या पूर्ण काचा फुटल्या. मात्र त्याचवेळी तेथील स्थानिक नागरिक पर्यटकांच्या मदतीसाठी आले व त्यांनी त्यांना आश्रय दिल्याने ते भाविक बचावले अशी माहिती नितीन काळे आणि सागर शेवाळे या भाविकांनी दिली.
दरम्यान दोन बस उधमपूरपर्यंत पोहोचल्या असून अन्य दोन बस वाहतूक कोंडीत अडकल्याचे समजते.
काल संध्याकाळी आम्ही परत येतान श्रीनगर पास करून पुढे आलो. तेव्हाच आम्हाल तीन अतिरेक्यांना मारण्यात आल्याचे व त्यामुळे तेथील नागरिक संतापून दगडफेक करत असल्याची माहिती कळली. आमची गाडी अनंतनाग येथील अवंतीपूर येथे पोहोचली असता तणावामुळे गाडी तीन-चार तास तेथेच अडकली. तेवढ्यात तेथे काही तरूण आले व त्यांनी आमच्या गाडीवर हल्ला चढवला. त्यांनी एकूण १००-२०० गाड्यांच्या काचा फोडल्या, असे काश्मीरमध्ये अडकलेले नाशिकचे भाविक सागर शेवाळे यांनी सांगितले.