कसाऱ्याजवळ अपघातात १ ठार; ९ जखमी
By Admin | Updated: July 4, 2016 04:41 IST2016-07-04T04:41:23+5:302016-07-04T04:41:23+5:30
मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा गावाजवळ साईखिंड वळणावर दोन गाड्या आणि ट्रकच्या अपघातात एक ठार

कसाऱ्याजवळ अपघातात १ ठार; ९ जखमी
कसारा : मुंबई-नाशिक महामार्गावरील कसारा गावाजवळ साईखिंड वळणावर दोन गाड्या आणि ट्रकच्या अपघातात एक ठार, तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली.
या दोन्ही गाड्या मुंबईहून नाशिकला जात होत्या. साईखिंड येथे उतार आणि वळण असल्यामुळे त्या सावकाश जात होत्या. त्याच वेळी मागून भरधाव ट्रक आला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकमधील लोखंडी प्लेट दोन्ही गाड्यांवर पडल्या. यामुळे गाड्या चेपल्या गेल्या. अपघाताचे वृत्त कळताच गॅमन इंडियाचे गस्त पथक, कसारा आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी गेले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर गाडीत अडकून पडलेल्या जखमींना बाहेर काढण्यात यश आले.
या भीषण अपघातात सुनील पाटील (५०) हे ठार झाले, तर रवी रोशलानी (३९), सिमरन रोशलानी (३५), लक्ष्मी अडवानी (५०), धीरज रोशलानी (१०), गुंजन रोशलानी (१२) आणि गाडीचा चालक सागर यांना त्वरित बाहेर काढून नाशिक येथील रुग्णालयात दाखल केले. तर, दुसऱ्या गाडीतून सुनील पाटील यांचा मृतदेह बाहेर काढला. या गाडीतून वंदना पाटील (४५), प्रणाली पाटील (१८), मयूर पाटील (२४) या जखमींना सुरक्षित बाहेर काढले. मयूर आणि वंदना हे आईमुलगा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. (वार्ताहर)
नागमोडी वळणांमुळे अपघात
अपघात झालेल्या ठिकाणी उतार आणि नागमोडी वळण असल्याने येथे कायम अपघात होतात. या भीषण अपघातानंतर एक कंटेनर आणि टँकर उलटून अपघात झाला. परिणामी, नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.