Karuna Munde on Seeshiv Munde Post: राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांचा पोटगी प्रकरणात वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेंना देखभालीसाठी महिन्याला एकूण दोन लाख रुपये द्यावेत, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. पोटगीची रक्कम तुटपुंजी असल्याचे म्हणत आपण यासाठी हायकोर्टात जाणार असल्याचे करुणा मुंडे म्हणाल्या. त्यानंतर करुणा आणि धनंजय मुंडे यांच्या मुलाने आईवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता मुलाच्या आरोपांवर करुणा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
घरगुती हिंसाचार प्रकरणात सुनावणी झाल्यानंतर वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने मंत्री धनंजय मुंडे यांना करुणा मुंडे यांना प्रत्येक महिन्याला दोन लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले. मात्र करुणा मुंडे यांनी ही रक्कम कमी असल्याचे म्हणत हायकोर्टात जाणार असल्याचे सांगितले. करुणा मुंडेंनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर त्यांचा मुलगा सिशिव मुंडे यांने एक पोस्ट करुन खळबळ उडवून दिली. माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते नुकसान पोहोचवणारे नाहीत असं विधान धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचा मुलगा सिशिव मुंडे याने केले. सिशिवने इन्स्टाग्राम स्टोरीमधून हा सगळा दावा केला. तसेच आई करुणा मुंडेंवर गंभीर आरोप देखील केले.
त्यानंतर आता करुणा मुंडे यांनी एबीपी माझासोबत बोलताना मुलाच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. "तो किती तणावात होता, त्यांच्या डोक्यावर किती प्रेशर होता हे माध्यमांनी पाहिलं आहे. माझ्यावरही मीडियासमोर बोलू नका यासाठी दबाव टाकला जात होता. मी काही वाईट बोलत नव्हती. मी न्यायालयाचे आणि माझ्या वकिलांचे फक्त आभार मानत होते. मुलांना सतत आपल्या वडिलांचे फोन येत होते. त्यातूनच दबाव निर्माण झाला आणि ही पोस्ट केली," असं स्पष्टीकरण करुणा मुंडे यांनी दिलं.
करुणा मुंडेंच्या मुलाने काय म्हटलं?
"मी सीशिव धनंजय मुंडे आहे आणि मला बोलणे महत्वाचे वाटते कारण मिडिया माझ्या कुटुंबाला मनोरंजनाचे साधन बनवत आहेत. माझे वडील कदाचित सर्वोत्कृष्ट नसतील, परंतु ते कधीही आमच्यासाठी हानिकारक नव्हते. तिने ज्या कौटुंबिक हिंसाचाराचा दावा केला आहे तो माझ्यावर, माझ्या बहिणीवर आणि माझ्या वडिलांवरही झाला आहे. माझ्या आईने वडिलांना मारहाण केली तेव्हापासून ते निघून गेले आणि त्यानंतर माझ्या आईने मला आणि बहिणीला सोडून दिले आणि तेथून जाण्यास सांगितले. कारण तिला आमच्याशी काही देणंघेणं नाही, असं सीशिवने स्पष्ट केलं आहे.
"२०२० पासून माझे वडील धनंजय हे माझी काळजी घेत आहेत आणि माझ्या आईला कोणत्याही आर्थिक समस्या नाहीत. माझी आई काही ना काही बहाने बनवत राहते. माझ्या आईने घरावरचं कर्ज सुद्धा फेडलेले नाही. आणि आता ती माझ्या वडिलांविरुद्ध सूडबुद्धीने लढण्यासाठी कथा रचत आहे," असंही सीशिवने म्हटलं आहे.