मराठी TIGERS च्या प्रदर्शनाला कर्नाटक उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील
By Admin | Updated: January 21, 2016 15:06 IST2016-01-21T15:06:05+5:302016-01-21T15:06:05+5:30
सीमाप्रश्नावर आधारीत मराठी टायगर्स या चित्रपटावर बंदी घालणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे

मराठी TIGERS च्या प्रदर्शनाला कर्नाटक उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील
>ऑनलाइन लोकमत
बेंगळुर, दि. २१ - सीमाप्रश्नावर आधारीत मराठी टायगर्स या चित्रपटावर बंदी घालणारी याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन आम्ही थांबवू शकत नाही आणि जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असेल तर त्यासंदर्भात सरकारने पावले उचलायला हवीत असे मत मुख्य न्यायाधीश सुभ्रो कमाल मुखर्जी व न्यायाधीश रवी मलिमथ यांनी व्यक्त केले आहे.
कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये अनेक दशकांपासून सीमाप्रश्न धगधगत आहे. या प्रश्नाला हात घालणारा हा सिनेमा असून तो ५ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला हिरवा कंदील दिला असून त्यावेळी कर्नाटक सरकारचे प्रतिनिधीही उपस्थित होते. मात्र, सीमाप्रश्नावर महाराष्ट्रविरोधी असलेल्यांनी कोर्टात याचिका करून प्रदर्शनास बंदी घालण्याची विनंती केली होती, जी फेटाळण्यात आली आहे.
आता, राज्य सरकारने सीमाभागामध्ये हा चित्रपट दाखवू दिला नाही तर आम्ही न्यायालयात दाद मागू अशी भूमिका निर्माते अभिजीत तहसीदार यांनी घेतली आहे. दरम्यान पोलीसांनी शांतता अबाधित रहावी यासाठी कन्नड व मराठी अशा दोन्ही गटांशी भेट घेऊन हिंसक मार्ग टाळण्याचे आवाहन केले आहे.