कर्नाटकात मिळणार भाडोत्री कृषी अवजारे !

By Admin | Updated: October 7, 2014 21:54 IST2014-10-07T21:54:28+5:302014-10-07T21:54:28+5:30

७० कोटींचा निधी : शेतकऱ्यांना नाममात्र भाडेतत्त्वावर उपलब्ध होणार

Karnataka agricultural equipment will be available in Karnataka! | कर्नाटकात मिळणार भाडोत्री कृषी अवजारे !

कर्नाटकात मिळणार भाडोत्री कृषी अवजारे !

म्हाकवे : शिक्षण व औद्योगीकरणामुळे शेतकऱ्यांना शेतमजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणावर भासत आहे. यामुळे शेतीच्या कामांना दिरंगाई होऊन त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होत आहे. यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने कर्नाटक शासनाने शेतीउपयोगी अवजारे खरेदी करून ती शेतकऱ्यांना नाममात्र भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याच्या संकल्प केला आहे. यासाठी राज्यात १८६ केंद्रे सुरू करण्यात येणार असून, या केंद्रांमार्फत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी ७० कोटी रुपयांचा निधीही निश्चित केला आहे. शेतीच्या उत्पादनवाढीमध्ये शेतमजूर हा घटक महत्त्वपूर्ण आहे; परंतु वाढत्या औद्योगिक वसाहती, छोटे-मोठे उद्योगधंदे, शहरांत जाणारा लोंढा यांमुळे शेती करणे अवघड झाले असून, शेतकऱ्यांसमोर यक्षप्रश्न उभे आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीमध्ये शेती टिकविण्यासाठी यांत्रिकीकरणाची कास धरणे गरजेचे आहे.  राज्याच्या अर्थसंकल्पात शेती आणि शेतकऱ्यांचा प्राधान्याने विचार करणाऱ्या कर्नाटक शासनाने शेतकऱ्यांना विविध शेती अवजारे नाममात्र भाडेतत्त्वावर देण्याचाही महत्त्वपूर्ण संकल्प केला आहे. प्रत्येक ग्राहक केंद्रास ७५ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. यातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पॉवर टिलर, आदी अवजारे भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहेत. दरम्यान, कृषी उत्पादनवाढीसाठी जमिनीच्या आरोग्य व्यवस्थापनाकरिता आवश्यक ती माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी कर्नाटक शासनाने राज्यातील कृषी विद्यापीठांना सूचना दिल्या आहेत. यामुळेही कृषी उत्पादनात किमान १५ टक्क्यांपर्यंत वाढ होईल, अशी आशाही शासनाच्या कृषी विभागाला वाटते.

सूक्ष्म सिंचनासाठीही निधी वाढविणार
कर्नाटक राज्यात उसासारख्या नगदी पिकाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. या पिकाला पाण्याची गरज जास्त असते. त्यामुळे पाण्याची बचत होऊन उत्पादनवाढीसाठी ठिबक, तुषार, आदी सूक्ष्म सिंचनावर भर देणे आवश्यक आहे. त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात सूक्ष्म सिंचनासाठी अधिक निधी उपलब्ध करण्याचा मानसही कर्नाटक शासनाच्या कृषी विभागाने केला आहे.

Web Title: Karnataka agricultural equipment will be available in Karnataka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.