जीवनात कर्म महत्त्वाचे : स्वरुपानंद
By Admin | Updated: April 30, 2016 01:17 IST2016-04-30T01:17:50+5:302016-04-30T01:17:50+5:30
जीवनात कर्म अत्यंत महत्त्वाचे असते. कर्माने अध:पतन आणि उत्क्रमणही होते.

जीवनात कर्म महत्त्वाचे : स्वरुपानंद
पिंपरी : जीवनात कर्म अत्यंत महत्त्वाचे असते. कर्माने अध:पतन आणि उत्क्रमणही होते. त्यामुळे आपण कोणत्या प्रकारचे कर्म करावे, ते आपल्या बुद्धीवर अवलंबून आहे. तसेच कर्म कोणत्या श्रद्धेने करतोय, हेही महत्त्वाचे आहे, असे मत स्वरुपानंद सरस्वती यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास महापौर शकुंतला धराडे, माजी उपमहापौर माई ढोरे, माजी आमदार दिगंबर भेगडे, डॉ. सचिन पाटील, मुकुंद आवटे, मनोज ढोरे, कृष्णा दाभोळे आदी उपस्थित होते. व्यक्तिमत्त्व विकास व्याख्यानमालेत ते बोलत होते.
स्वरुपानंद सरस्वती म्हणाले की, जीवनाची खरी किंमत ही त्याच्या आचार-विचारावरून समजते. जीवनात फक्त पैसा महत्त्वाचा नसून, माणसाचा आंतरिक विकास होणे गरजेचे आहे. आंतरिक विकासातून सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. त्यामुळे माणसाचा व्यक्तिमत्त्व विकास होण्यास मदत होईल. मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता त्यांचा सर्वांगीण विकास होईल, असे शिक्षण देण्याची गरज असते.
मनाचा आंतरिक विकास महत्त्वाचा आहे. त्यामुळे मुलांना काय शिकवायचे, हे ठरवायला हवे. त्यामुळे जीवनाचा खरा अर्थ समजण्यास त्यांना मदत होईल, असेही ते म्हणाले. अतुल राऊत यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले. (प्रतिनिधी)