कर्जतची कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल!

By Admin | Updated: May 30, 2016 02:24 IST2016-05-30T02:24:14+5:302016-05-30T02:24:14+5:30

कर्जत तालुक्यात कुपोषित बालकांच्या प्रमाणात दोन वर्षांत कमालीची घट झाली आहे.

Karjat will move towards malnutrition! | कर्जतची कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल!

कर्जतची कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल!

कांता हाबळे,

नेरळ- कर्जत तालुक्यात कुपोषित बालकांच्या प्रमाणात दोन वर्षांत कमालीची घट झाली आहे. दोन वर्षांच्या सर्वेक्षणात संपूर्ण कर्जत तालुक्यात मध्यम कुपोषित व अतितीव्र कुपोषित अशी सुमारे ५२८ बालके सर्वेक्षणात कुपोषित असल्याची नोंद झाली होती. त्यानंतर एप्रिल २०१६ च्या सर्वेक्षणात हा आकडा १४५ वर येऊन पोहचला आहे. म्हणजेच यात सुमारे ३८० बालकांवर उपचार करून ही बालके कुपोषणमुक्त झाली असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाने दिली आहे.
कर्जत तालुक्यात नेरळ, कळंब, खांडस व अंबिवली, कडाव, मोहिली असे दोन बिट असून यामध्ये छोट्या अंगणवाड्या व मोठ्या अशा एकूण सुमारे ३३५ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांच्या सर्वेक्षणानुसार या कुपोषित बालकांची नोंद करण्यात आली आहे. यात ६ महिने ते ३ वर्षाच्या बालकांना सोयाबीन पावडर, उपमा, शिरा असा आहार दिला जातो. जुलै २०१४ च्या सर्वेक्षणानुसार तालुक्यात मध्यम कुपोषित असे एकूण ४३३ बालके व अतितीव्र कुपोषित ९५ अशी सुमारे ५२८ बालके कुपोषित असल्याची नोंद झाली होती. यात सर्वात जास्त कुपोषित बालके ग्रामीण व आदिवासी भागात असल्याची नोंद झाली आहे. तर एप्रिल २०१६ च्या सर्वेक्षणात मोठ्या प्रमाणात घट झाली असून त्यात मध्यम कुपोषित ११२ तर तीव्र कुपोषित ३३ बालकांचा समावेश आहे. परंतु मागील वर्षापासून शासनाकडून या बालकांवर योग्य ते उपचार होत नसल्याचे आढळून आले आहे. मागील महिन्यात तालुक्यात शून्य ते पाच वयोगटातील तीन आणि जन्मत:च तब्बल ३६ बालकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आरोग्य विभाग सुस्त असल्याबद्दल कर्जत तालुक्याच्या आमसभेत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. २०१५-१६ या आर्थिक वर्षात मंजूर आरसीएच, पीआयपीमध्ये केंद्र शासनाकडून बाल विकास केंद्रासाठीचा निधी मंजूर के ला नाही. त्यामुळे प्रत्येक बाल विकास केंद्र बंद करण्याचे जिल्हा परिषदेला पत्राद्वारे कळविले आहे.
शासनाकडून निधी बंद झाल्याने कुपोषित बालकांवर उपचार केले जात नाहीत. सध्या कर्जत तालुक्यातील कशेळे येथील शबरी सेवा समिती व कर्जतमधील लाइट आॅफ लाइफ संस्थेकडून या कुपोषित बालकांची तपासणी करून त्यांना औषधे पुरविली जातात.
>कर्जतमधील कुपोषित बालकांना तपासणी करून औषधे देण्यात येत आहे, तसेच गरोदर मातांची नऊ महिन्यांत चार वेळा तपासणी करण्यात येते. ज्यांचे वजन व रक्त कमी असेल त्यांना औषधे व गोळ्या देण्यात येतात.
- डॉ.सी.के. मोरे,
तालुका वैद्यकीय अधिकारी कर्जत
अनेक अंगणवाड्यांमधील बालकांची आरोग्य तपासणी करून कुपोषित तसेच अनेक प्रकारची आजारी बालके आढळल्यास त्यांना मिल्ट विटॅमीन सिरप देण्याचे काम आमची संस्था करत आहे. तसेच अनेक अंगणवाड्यांमध्ये कॅप आयोजित करून त्यांच्यावर उपचार केले जातात.
- डॉ. गीतांजली हजारे,
लाइट आॅफ लाइफ संस्था, कर्जत

कर्जतमधील अनेक कुपोषित बालकांवर उपचार केले आहेत. तसेच तेथील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम शबरी समितीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच अशा अनेक बालकांना आयुर्वेदिक औषधोपचार केले जात आहेत.
-प्रमोद करंदीकर,
सचिव, शबरी सेवा समिती, कशेळे
>सध्या कर्जत तालुक्यातील कशेळे येथील शबरी सेवा समिती व कर्जतमधील लाइट आॅफ लाइफ संस्थेकडून या कुपोषित बालकांची तपासणी करून त्यांना औषधे पुरविली जातात.

Web Title: Karjat will move towards malnutrition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.