कन्याकुमारी गाठले १३ दिवसात !
By Admin | Updated: March 27, 2015 00:29 IST2015-03-27T00:29:14+5:302015-03-27T00:29:14+5:30
महाराष्ट्रासह, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू अशा राज्यांमधून जात ‘पुणे ते कन्याकुमारी’ हा १५६५ किमीचा प्रवास सायकलस्वारांनी केवळ १३ दिवसांत पूर्ण केला.

कन्याकुमारी गाठले १३ दिवसात !
सहकारनगर : महाराष्ट्रासह, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू अशा राज्यांमधून जात ‘पुणे ते कन्याकुमारी’ हा १५६५ किमीचा प्रवास सायकलस्वारांनी केवळ १३ दिवसांत पूर्ण केला.
ही मोहीम अनुभवी सायकलपटू उपेंद्र शेवडे यांच्या नेतृत्वाखाली आखण्यात आली होती. त्यांच्या सोबत असणारा त्यांचा मुलगा वेदांग, आनंद घाटपांडे या वेळीही मोहिमेत सहभागी होते. याखेरी सुहृद घाटपांडे, ओंकार ब्रह्मे, अद्वैत जोशी, नंदू आपटे, उमेश पवार आणि आशिष फडणीस हे मोहिमेचे सदस्य होते.
सारसबाग येथील गजाननाचे दर्शन घेऊन मोहिमेची सुरवात केलीे. पहिलाच टप्पा हा १६५ किमीचा होता. खंबाटकी घाट; तसेच साताऱ्या जवळील खिंड पार करीत सायकलपटूंनी कराड गाठले.
दुसऱ्या टप्प्यात निपाणी (११० किमी) आणि त्यानंतर धारवाड (१४५ किमी) असे टप्पे मोहिमेने घेतले. तिसऱ्या टप्प्यात सायकलस्वारांना वेगवान वारे आणि सातत्याने चढ उतार असलेल्या रस्त्यांचा सामना करावा लागला.
या रस्त्यात लागलेले दांडेलींचे सुरेख जंगल आणि येल्लापूरनंतर लागलेला २५ किमी अंतराचा घाट हे प्रमुख आकर्षण ठरले, अशी माहिती ओंकार ब्रह्मे यांनी दिली. अंकोला ते मारवंथे हे १३५ किमीचे अंतर पार केले. या टप्प्यात चढउतार तर बरेच होते खेरीज रस्ताही खराब असल्याने सायकलस्वारांना अडचणींचा सामना करावा लागला. किनारपट्टीच्या बाजूबाजूने मार्गक्रमण करीत मोहिमेने ११० किमी अंतर पार करीत मँगलोर गाठले. केरळमधील अप्रतिम निसगसौंदर्य, सुरेख किनारे, नारळी पोफळीच्या बागा, अद्यापही सुस्थितीत असलेले किल्ले आणि प्रसिद्ध मंदिरे यामुळे हा प्रवास अतिशय बहारीचा झाला, असेही त्यांनी सांगितले. पुन्हा १०० किमी अंतर पार करून, सायकलस्वारांनी गुरुवायुरच्या प्रसिद्ध मंदिराचे दर्शन घेऊन दिवसाची सांगता केली.
या वेळी मोहिमेतील सदस्यांचा आश्रमाच्या वतीने एक छोटेखानी सत्कार करण्यात आला. मोहिमेतील काही सदस्यांचे कुटुंबीयही या वेळी स्वागताला उपस्थित होते.
या मोहिमे दरम्यान प्रचंड उन, घामाच्या धारा, दमणूक असे सर्व काही अनुभवले पण त्याहीपेक्षा मोहीम यशस्वी केल्याचा आनंद मोठा होता, असे आशिष फडणीस म्हणाले.
(प्रतिनिधी)
४ अकराव्या दिवशी ११० किमी अंतर पार करून, मोहीम चावरा येथे पोहोचली व बाराव्या दिवशी ९० किमी पार करून, तिरुवनंतपुरम गाठले. मोहिमेच्या शेवटच्या दिवशी १०० किमी अंतर पार करावे लागले; परंतु एका स्थानिक सणासाठी रस्ते बंद झाल्यामुळे, अक्षरश गल्लीबोळांतून वाट काढत सायकलस्वार कन्याकुमारी येथे पोहोचते झाले.