कणकवलीत नारायण राणेंना धक्का, माधुरी गायकवाड नगराध्यक्ष
By Admin | Updated: October 8, 2015 15:21 IST2015-10-08T15:21:39+5:302015-10-08T15:21:58+5:30
कणकवली नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसमधील बंडखोर संदेश पारकर यांच्या गटाने बाजी मारत नारायण राणेंना दणका दिला आहे.

कणकवलीत नारायण राणेंना धक्का, माधुरी गायकवाड नगराध्यक्ष
ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. ८ - कणकवली नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसमधील बंडखोर संदेश पारकर यांच्या गटाने बाजी मारत नारायण राणेंना दणका दिला आहे. नगराध्यक्षपदी पारकर गटाच्या माधुरी गायकवाड यांची निवड झाली असून शिवसेना - भाजपाची साथ मिळाल्याने पारकर गटाच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
१७ नगरसेवक असलेल्या कणकवली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. काँग्रेसचे बंडखोर संदेश पारकर गटानेही नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज केल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली होती. गुरुवारी पार पडलेल्या निवडणुकीत पारकर गटाच्या माधुरा गायकवाड यांनी काँग्रेसच्या सुविधा साटम यांचा पराभव केला. गायकवाड यांना नऊ मत पडली. शिवसेना - भाजपाच्या नगरसेवकांची साथ मिळाल्याने माधुरी गायकवाड नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या.
उपनगराध्यक्षपदी पारकर गटाचेच कन्हैया पारकर यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. त्यांनाही नऊ मते मिळाली. संदेश पारकर हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. राष्ट्रवादीत असतानाही त्यांनी नारायण राणेंना आव्हान दिले होते. पण कालांतराने ते काँग्रेसमध्ये आले होते. नारायण राणे विश्वासात घेत नसल्याने पारकर नाराज होते अशी चर्चा आहे.