कणकवली : पालकमंत्रीपद कोणाकडे?
By Admin | Updated: November 3, 2014 23:26 IST2014-11-03T21:58:09+5:302014-11-03T23:26:33+5:30
शिवसेना की भाजपा : दहा वर्षानंतर पहिल्यांदाच उत्सुकता

कणकवली : पालकमंत्रीपद कोणाकडे?
कणकवली : अनेकांचे पत्ते कट करणारी आणि अनेकांना नवीन संधी देणारी यावेळीची विधानसभा निवडणूक सर्वार्थाने आगळी-वेगळी ठरली. धक्कादायक निकालांमुळे वर्षानुवर्षांची राजकीय गणिते बदलणार आहेत. गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसकडे पर्यायाने नारायण राणे यांच्याकडे सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद होते. मात्र, यावेळी भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. परंतु भाजपाकडे सिंधुदुर्गातील एकही आमदार नाही. शिवसेनेने अजूनही आपण सत्तेत राहणार की विरोधी बाकावर बसणार याबाबत भूमिका स्पष्ट केली नसल्याने यावेळी सिंधुदुर्गच्या पालकमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार. हे पद शिवसेनेकडे, भाजपाकडे राहणार याबाबत तर्कविर्तक लढविले जात आहेत.
सन २00५ मध्ये नारायण राणे यांनी शिवसेनेला जयमहाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गेली दहा वर्षे म्हणजे दोन टर्म त्यांनी पालकमंत्री पद भुषविले होते. यावेळी मात्र, भाजपाचे सरकार आले आहे. परंतु भाजपाचा एकही आमदार निवडून आला नाही. सिंधुदुर्गात शिवसेनेचे दोन आमदार निवडून आले आहेत. परंतु शिवसेनेने आपली सत्तेबाबतची भूमिका अद्याप स्पष्ट केली नाही. जर शिवसेना सत्तेत सामील झाली तर पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाईल. त्यात नारायण राणे यांचा पराभव करून जायंट किलर ठरणारे वैभव नाईक यांच्याकडे पालकमंत्रीपदाची धुरा जाण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे दीपक केसरकर यांची ही दुसरी टर्म आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांचा त्यांच्याकडे अनुभव आहे. तसेच त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या विजयामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे या दोघांमध्ये पालकमंत्रीपदाची माळ उद्धव ठाकरे कोणाच्या गळ्यात टाकतात. याबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे सेना सत्तेत जाणार की विरोधी बसणार यावर सिंधुदुर्गातील आगामी राजकारणाची बहुतांशी गणिते अवलंबून आहेत. असे असले तरी शिवसेनेकडून दीपक केसरकर, वैभव नाईक आणि भाजपाकडून माजी आमदार प्रमोद जठार यांच्या नावाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. भाजप जिल्ह्यातील संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रमोद जठार यांना संधी देईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. तर एकंदरीत भाजपाची मिनी मंत्रिमंडळ बनविण्याची रणनिती पाहता विनोद तावडे यांच्या गळ्यात सिंधुदुर्गच्या पालकमंत्रीपदाची माळही पडू शकते असाही एक मतप्रवाह आहे. प्रत्यक्षात शिवसेनेच्या भूमिकेनंतरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री कोणाचा होणार यावर शिक्कामोर्तब होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
विनोद तावडेंच्या नावाची चर्चा
शिवसेनेकडून पालकमंत्रीपदासाठी मालवणचे आमदार वैभव नाईक यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या पराभवामध्ये जायंट किलर म्हणून वैभव नाईक यांची ओळख महाराष्ट्रभर झाली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाईक यांना संधी देऊ शकतात.
विनोद तावडेंच्या नावाची चर्चा
देवेंद्र फडणविस यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेले आणि आता शिक्षणमंत्री म्हणून निवड झालेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कुणकवण गावचे सुपूत्र विनोद तावडे यांच्याकडे सिंधुदुर्गच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे. जर शिवसेना विरोधी पक्षात गेली. तर भाजपाचाच पालकमंत्री होण्याची शक्यता आहे. त्यात तावडे यांचे नाव आघाडीवर आहे. कारण प्रमोद जठार यांना पालकमंत्री करायचे झाल्यास त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावावी लागेल. एकीकडे भाजपाचे मंत्रिमंडळ हे कमी मंत्र्यांचे आहे. त्यामुळे विद्यमान मंत्र्यांकडे राज्याच्या विविध भागातील पालकमंत्रीपदांची जबाबदारी जाण्याची दाट शक्यता आहे.
सेनेसाठी बुजुर्ग व्यक्तिमत्त्व
सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर हे सध्याच्या शिवसेनेच्या आमदारांमध्ये बुजूर्ग व्यक्तिमत्त्व आहे.
त्यातच खासदार नीलेश राणे यांच्या पराभवाच्यावेळी केसरकर यांनी राष्ट्रवादीत असतानाही सेनेला मदत केली होती. तसेच उद्धव ठाकरेंनी त्यांची अनेकदा स्तुतीदेखील केली आहे.