कोंडीत गुदमरला जीव!
By Admin | Updated: August 2, 2016 01:08 IST2016-08-02T01:08:35+5:302016-08-02T01:08:35+5:30
अधूनमधून येणारा पाऊस, रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, वाढती वाहनांची संख्या यामुळे शहरात अनेक ठिकाणी सोमवारी शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली

कोंडीत गुदमरला जीव!
पुणे : अधूनमधून येणारा पाऊस, रस्त्यांवर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, वाढती वाहनांची संख्या यामुळे शहरात अनेक ठिकाणी सोमवारी शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.
आज सकाळपासूनच दिवसभर पावसाची रिपरिप होती. त्यामुळे वाहतूक संथ गतीने चालली होती. त्यातच शहरातील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे सकाळी व सायंकाळी महत्वाच्या रस्त्यांवर नेहमीच वाहतूककोंडी होत असते़ त्यात पाऊस असेल तर एरवी दुचाकीवरुन जाणारेही मोटार घेऊन बाहेर पडत असल्याने रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसते़ सोमवारी पहाटेपासूनच पाऊस सुरु झाला़ त्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या मोटारींच्या संख्येत वाढ झाली होती़ अनेक रस्त्यांवरील चौकात खड्डे पडले आहेत़ त्यात पाऊस यामुळे वाहनांचा वेग कमी झाल्याने महत्वाच्या रस्त्यांवर वाहनांच्या लांबवर रांगा लागलेल्या दिसत होत्या़ अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त शहराच्या विविध भागातून सारसबाग येथील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी कार्यकर्ते मिरवणुकीने येत होते़ त्याने या कोंडीत भर घातली़
सिमेंटच्या रस्त्यावरील अनेक चौकात पेविंग ब्लॉक्स बसविण्यात आले आहेत़ त्यातील अनेक ब्लॉक्स उंचसखल झाल्याने ऐन चौकातच वाहनांना वेग कमी करावा लागतो़ त्याचा परिणाम होऊन वाहतूक कोंडीत आणखी भर पडताना दिसत आहे़ स्वारगेटपासून गोळीबार मैदान, रेसकोर्स, पुलगेटपासून सोलापूर रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या़
>कर्वेरोड, सेनापती बापट रोड, इंजिनिअरिंग कॉलेज, मार्केटयार्ड, कात्रज रोड या परिसरात दुपारपासूनच वाहतूक कोंडी झाली होती़ ऐकरी असलेल्या जंगली महाराज रोडवर डेक्कन जिमखान्यापासून अगदी बालगंधर्व रंगमंदिरांपर्यंत वाहनांची रांग लागलेली होती़ त्याचा ताण घोले रोड, आपटे रोडवर येऊन तेथेही वारंवार वाहतूक कोंडी होताना दिसत होती़