कांचीवरम् साड्यांचे आता सोलापुरात उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 03:03 PM2019-11-27T15:03:18+5:302019-11-27T15:05:07+5:30

राज्यातील मोठ्या शहरांमधून मागणी : हातमागावर तयार केल्या जाताहेत साड्या, आकर्षक विणकामाची भुरळ

Kanchiwaram sarees are now produced in Solapur | कांचीवरम् साड्यांचे आता सोलापुरात उत्पादन

कांचीवरम् साड्यांचे आता सोलापुरात उत्पादन

googlenewsNext
ठळक मुद्देएक कांचीवरम् साडी तयार करायला साधारण तीन ते चार दिवस लागतातएका साडीची मजुरी चार हजार दोनशे रुपये इतकीआठवड्यात किमान दोन साड्या तयार होतात साडीचे काम अत्यंत बारीक असते

सोलापूर : देशात कांचीवरम्च्या साड्यांना विशेष मागणी आहे़ कांचीवरम्च्या साड्या इतर साड्यांच्या तुलनेत वेगळी अदब राखून असतात़ या साड्यांचा मोठा चाहता वर्ग आहे़ त्यामागे मोठी प्रतिष्ठादेखील राखीव असते़ आता या कांचीवरम्च्या साड्यांवर सोलापुरी छाप उमटत आहे़ होय, हे खरे आहे़ सोलापुरातील हातमागावर कांचीवरम्च्या साड्या तयार होत आहेत़ आणि या साड्यांवर सोलापुरी विणकाम उठून दिसतेय.

सोलापुरी कांचीवरम्च्या साड्यांना पुणे, मुंबई, नागपूरसारख्या ठिकाणाहून चांगली मागणी येत आहे.  हातमाग व्यावसायिक शिवराज मोने यांच्याकडे या साड्या तयार होत आहेत़ बोळकोटे नगरातील कृष्णाहरी काकी या विणकराकडे कांचीवरम्च्या साड्या विणल्या जात आहेत़ या साड्यांना मोठी मागणी आहे़ पण एकाच विणकराकडे या साड्या विणल्या जात आहेत़ कांचीवरम् साड्यांचे काम बारीक असते़ त्यामुळे अनुभवी विणकरच या साड्या विणतात़ यात विणकर कृष्णाहरी काकी हे पारंगत आहेत़ सोलापुरात विणकामाला मोठा इतिहास आहे.

या विणकामाची छाप कांचीवरम् साड्यांवर उमटत आहे़ पैठणी, इरकल आणि गदवाल साड्यांची प्रतिष्ठा वेगवेगळी आहे़ मोने यांच्याकडेच पैठणी साड्या तयार होतात़ पैठणी साड्यांना देशभरातून चांगली मागणी आहे़ याच धर्तीवर आम्ही कांचीवरम् साड्या तयार करण्याचा निर्णय घेतला़ सध्या एकाच हातमागावर कांचीवरम् साड्या तयार होत आहेत, पुढे हातमागांची संख्या वाढवणार आहोत़ सोलापूरच्या कांचीवरम् साड्यांची किंमत साधारण दहा हजार पाचशे रुपये इतकी आहे़ या साड्या पुणे, मुंबई आणि नागपूरच्या शोरुम्समध्ये पंधरा ते वीस हजारांना विकतात़


अशी आहेत वैशिष्ट्ये...
- उपाडा बुट्टा पॅटर्न कांचीवरम् साड्या सोलापुरात तयार होत आहेत़ या साड्यांचे आयुष्यमान किमान दहा वर्षे आहे़ प्लेन बॉर्डर आणि ब्लाऊज पीस ब्रोकेट पद्धतीचे आहे़ ब्लाऊज आणि पल्लू कलर एकसारखे असते़ या साड्यांना प्रेस करायची गरज नाही़ येथील साड्या काळ्या पडत नाहीत़ कमीत कमी धुवायची गरज भासते़ इतर साड्यांना प्रेस करण्याची गरज भासते़ कांचीपूरम्च्या कांचीवरम् साड्यांना सोनेरी जरी असते, तसे तेथील विणकर सांगतात़ त्यामुळे त्या साड्यांना देश-विदेशात मोठी मागणी आहे़ आता त्याच धर्तीवर सोलापुरात कांचीवरम् साड्या तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे कांचीवरम् साड्यांचे उत्पादक शिवराज मोने सांगतात़

एक कांचीवरम् साडी तयार करायला साधारण तीन ते चार दिवस लागतात़ एका साडीची मजुरी चार हजार दोनशे रुपये इतकी आहे़ आठवड्यात किमान दोन साड्या तयार होतात़ साडीचे काम अत्यंत बारीक असते़ त्यामुळे काम जपून करावे लागते़
- कृष्णाहरी काकी, विणकर

Web Title: Kanchiwaram sarees are now produced in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.