कामोठेत दोन चाळी जमीनदोस्त
By Admin | Updated: May 21, 2016 02:38 IST2016-05-21T02:38:58+5:302016-05-21T02:38:58+5:30
सिडकोने शुक्र वारी अतिक्र मणविरोधी मोहीम हाती घेवून अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या दोन चाळी जमीनदोस्त केल्या.
_ns.jpg)
कामोठेत दोन चाळी जमीनदोस्त
कळंबोली : कामोठे वसाहतीत सिडकोने शुक्रवारी अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेवून अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या दोन चाळी जमीनदोस्त केल्या. त्याचबरोबर एका गरजेपोटी बांधण्यात आलेल्या घरावर कारवाई करण्यात येत असताना येथे राहणाऱ्या स्थानिक प्रकल्पग्रस्ताने अंगावर रॉकेल ओतून विरोध केला. गरजेपोटी बांधण्यात आलेली घरे कायम करण्याची शासनाची भूमिका असताना सिडकोे अशा प्रकारे हेतूपुरस्सर कारवाई करीत असल्याचा आरोप करीत प्रशांत म्हात्रे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
सिडकोकडून अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईला वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मोहीम तीव्र करण्यात आली आहे. शुक्र वारी बांधकाम नियंत्रक एस.जे. गोसावी यांच्या नेतृत्वाखाली कामोठे वसाहतीत, दोन पोकलेन, एक जेसीबी, एक ट्रक, दोन जीप कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सकाळी कारवाईला सुरूवात केली. सेक्टर ६ ए मध्ये दोन अनधिकृत चाळी बांधण्यात आल्या होत्या. या चाळीतील घरे भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. सिडकोने या दोनही चाळीवर हातोडा मारला. त्यामुळे भाड्याने राहणाऱ्या काहींचे संसार रस्त्यावर आले. त्यानंतर सिडकोने भूखंड क्र मांक ४ आणि ५ वर कारवाई केली. येथील कौलारू घरावर कारवाईचा बडगा उगारताच येथे राहणाऱ्या प्रशांत म्हात्रे व त्यांच्या कुटुंबीयांनी विरोध दर्शवला. या ठिकाणी आमचे वडिलोपार्जित घर असून १९६० पासून आमचे कुटुंब राहत आहे. हे घर गरजेपोटी बांधलेले असून ते कायम करावे, अशी मागणी म्हात्रे कुटुंबीयांना वारंवार सिडकोकडे केली आहे. याबाबत लेखी पत्रही प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सिडको कारवाईवर ठाम असल्याचे पाहून प्रशांत म्हात्रे यांनी आपल्या अंगावर रॉकेलचे कॅन ओतून घेत जाळून घेण्याची धमकी पथकाला दिली.
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे, कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नाईक यांनी मध्यस्थी करून हा प्रश्न सामोपचाराने सोडविण्याचे आवाहन सिडको आणि म्हात्रे कुटुंबीयांना केले. त्यानुसार कारवाईला स्थगिती देण्यात आली. यावेळी शेकापचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, पंचायत समितीचे सदस्य सखाराम पाटील, उपसरपंच के.के. म्हात्रे यांनी उपस्थित राहून या कारवाईला विरोध दर्शवला.
(वार्ताहर)
>साडेबारा टक्के योजनेंतर्गत सिडकोकडून म्हात्रे कुटुंबीयांना बाजूला भूखंड देण्यात आला आहे. त्या ठिकाणी चौदा माळ्याची इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. तरी सुध्दा त्यांनी नोडल क्षेत्रातील भूखंडावर अतिक्र मण केले आहे. हा भूखंड साडेबारा टक्के योजनेमध्ये दुसऱ्या प्रकल्पग्रस्ताला देण्यात आलेला आहे. त्यामुळे ही जागा खाली करण्याचे वारंवार सांगून त्याची अंमलबजावणी झाली नाही.
- एस.जे. गोसावी, बांधकाम नियंत्रक, सिडको
>भूखंड खाली करण्यास चार दिवसांची मुदत
भूखंडावर कौलारू घर बांधून अतिक्र मण करण्यात आलेले आहे. ही जागा खाली करण्याकरिता सिडकोने यापूर्वी तीन वेळा मोहीम हाती घेतली होती. मात्र त्याला विरोध झाल्याने कारवाईत अडथळे निर्माण झाले. शुक्रवारी पुन्हा अनधिकृत बांधकामविरोधी पथक पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याकरिता या ठिकाणी आले. मात्र घरावर बुलडोझर फिरविण्यात आला नाही. यासंदर्भात अतिक्र मण विभागाने चार दिवसांची मुदत देवून या प्रकरणी सोक्षमोक्ष लावण्यास संबंधितांना सांगण्यात आले आहे. या घराला लष्करी छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.