काँग्रेसच्या सर्व पदांचा कामत यांचा राजीनामा

By Admin | Updated: April 27, 2017 02:24 IST2017-04-27T02:24:51+5:302017-04-27T02:24:51+5:30

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी बुधवारी दुपारी अचानक काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला.

Kamat resigns from all the posts of Congress | काँग्रेसच्या सर्व पदांचा कामत यांचा राजीनामा

काँग्रेसच्या सर्व पदांचा कामत यांचा राजीनामा

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी बुधवारी दुपारी अचानक काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. तथापि, गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदावरून हटवल्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
गुरुदास कामत यांना गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदावरून हटवून त्यांच्या जागी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसने केलेल्या या पक्षांतर्गत फेरबदलावर कामत नाराज होते. गुजरातमध्ये डिसेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. गुजरात हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याने या निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या आहेत.
काँग्रेससाठी कुठल्याही परिस्थितीत गुजरात जिंकणे, हेच सध्या ध्येय आहे. त्यासाठी काँग्रेसने गुजरातमध्ये संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कामत यांना हटवून त्यांच्या जागी गेहलोत यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समजते. गुरुदास कामत गेल्या काही काळापासून पक्षावर नाराज होते. यासंदर्भात त्यांनी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन नाराजी व्यक्तही केली होती. मुंबई पालिका निवडणुकीमध्येही उमेदवार ठरवण्यावरून त्यांचे तत्कालीन मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्याबरोबर मतभेद झाले. तेव्हाही त्यांनी राजीनामा दिला. तेव्हा त्यांची समजूत काढली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Kamat resigns from all the posts of Congress