चित्रपट महामंडळात सामंजस्याचे वारे !
By Admin | Updated: May 21, 2016 02:09 IST2016-05-21T02:09:44+5:302016-05-21T02:09:44+5:30
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अलीकडेच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर महामंडळात सत्तांतर झाले

चित्रपट महामंडळात सामंजस्याचे वारे !
राज चिंचणकर,
मुंबई- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अलीकडेच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर महामंडळात सत्तांतर झाले आणि या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या नवनिर्वाचित संचालकांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीनंतर महामंडळात सामंजस्याचे वारे वाहू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. महामंडळाच्या संचालकांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी वार्तालाप करतेवेळी ही बाब स्पष्ट झाली.
कोल्हापूर येथे या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याच्या काळात कथित मारहाणीच्या काही घटना घडल्याचे, महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष विजय पाटकर यांनी निवडणुकीच्या निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. आता स्वत: विजय पाटकर या विद्यमान संचालकांच्या मांदियाळीत असताना त्यांची याविषयीची एकूणच भूमिका काय असेल, याबाबत औत्सुक्य होते. या पार्श्वभूमीवर, आता आमचा समेट झाला आहे. महामंडळाच्या भल्यासाठी एकत्रितपणे काम करणार असल्याचे विजय पाटकर यांनी स्पष्ट केले आहे. तर, महामंडळाच्या हिताच्या दृष्टीने आम्ही एकदिलाने कार्यरत राहू, अशी भूमिका महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी मांडली आहे. दरम्यान, महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी घडलेल्या काही अनुचित प्रकाराबाबत अध्यक्ष या नात्याने खेद व्यक्त करणारे पत्र मेघराज राजेभोसले यांनी महामंडळाच्या बैठकीत सादर केल्याचे वृत्त आहे. महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून मेघराज राजेभोसले यांची निवड झाल्यानंतर मुंबईत सर्व संचालकांच्या उपस्थितीत प्रथमच ही बैठक झाली. महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या पॅनलने १४ पैकी १२ जागा जिंकत बाजी मारली होती; तर विजय पाटकर यांच्या पॅनलचे त्यांच्यासह मिळून एकूण दोन उमेदवार विजयी झाले होते. या निवडणुकीच्या निकालाच्या काळात गढूळलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सध्या महामंडळात सामंजस्य निर्माण झाल्याचे एकूणच चित्र आहे.