कालवार गावात दारूभट्टीवर छापा
By Admin | Updated: June 24, 2015 01:54 IST2015-06-24T01:54:40+5:302015-06-24T01:54:40+5:30
भिवंडी तालुक्यातील कालवार गावात राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने छापा मारु न दारूच्या भट्टीसह दोन गोदामे उद्ध्वस्त केली. या कारवाईत सुमारे २ हजार ७०० लीटर गावठी दारु जप्त केली आहे

कालवार गावात दारूभट्टीवर छापा
ठाणे : भिवंडी तालुक्यातील कालवार गावात राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने छापा मारु न दारूच्या भट्टीसह दोन गोदामे उद्ध्वस्त केली. या कारवाईत सुमारे २ हजार ७०० लीटर गावठी दारु जप्त केली आहे. विशेष म्हणजे, ही भट्टी चक्क शाळेच्या बाजूलाच सुरू असूनही पोलीस आणि संबधीत यंत्रणेला त्याची माहितीही
नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईच्या मालवणी भागात विषारी दारु प्यायल्याने १०० पेक्षा अधिक जण ठार झाल्यानंतर बेकायदेशीरपणे चालवण्यात येणाऱ्या दारूच्या अड्यांवर धाडसत्र सुरु करण्यात आले आहे. सोमवारी ठाणे आणि उल्हासनगरातील ७ दारु अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले होते. आता ग्रामीण भागातील दारु अड्ड्यांवर कारवाई सुरु केली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे महाराष्ट्र राज्याच्या भरारी पथकाचे निरीक्षक सुभाष जाधव यांना भिवंडीच्या कालवार गावामध्ये बेकायदेशीरपणे दारु ची भट्टी सुरु असल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारे त्यांच्या भरारी पथकाने कालवार गावात छापा मारला.
त्यावेळी येथील मराठी शाळेच्या बाजूलाच एक दारु ची भट्टी सुरु असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ती सील केल्यानंतर आजूबाजूला तपासणी केली असता, दोन गोदामांमध्ये पिंप आणि कॅन्समध्ये भरलेली सुमारे २ हजार ६९० लीटर गावठी दारु आढळली. या दारु सह सुमारे ३ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. (प्रतिनिधी)