धर्मांधतेचे विष कालवणाऱ्यांच्या मनात कालवाकालव-जितेंद्र आव्हाड
By Admin | Updated: October 17, 2016 04:23 IST2016-10-17T04:23:31+5:302016-10-17T04:23:31+5:30
जातीय व धर्मविद्वेशाचे विष कालवणाऱ्यांच्या मनात आज कालवाकालव सुरू झाली असेल.

धर्मांधतेचे विष कालवणाऱ्यांच्या मनात कालवाकालव-जितेंद्र आव्हाड
ठाणे : जातीय व धर्मविद्वेशाचे विष कालवणाऱ्यांच्या मनात आज कालवाकालव सुरू झाली असेल. कारण, ठाण्यातील मराठा मोर्चात सर्व जाती, धर्मांच्या लोकांचा लक्षणीय सहभाग बघितल्यावर आपल्यासाठी दगड कोण उचलणार, घरे कोण जाळणार, तोडफोड कोण करणार, हा प्रश्न त्यांच्या मनात उभा राहत असेल. याचे कारण अनेक वर्षांनंतर हातात भगवा घेऊन मुसलमान चालताना दिसतोय. मराठा मोर्चात कोळी, आगरी हे ठाणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी सहभागी झालेले दिसत आहेत. हेच या मराठा मोर्चाचे यश असून मराठा मोर्चाने एक वेगळी दिशा दिली असल्याचे मत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.
ज्या मराठा मोर्चाने इतिहासाला एक वेगळी दिशा दिली, मराठ्यांनी शिवाजी महाराजांच्या काळात एक वेगळा इतिहास लिहिला, अठरापगड जाती एकत्र केल्या, तेच मराठे आता पुन्हा तोच इतिहास लिहीत आहेत. आज परत एकदा अठरापगड जाती एकत्र येत आहेत. मदारी मेहतर नावाची पाणपोई दिसली. शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात गेले, तेव्हा त्यांच्यासोबत असलेले आणि आग्रा येथून महाराज निघून रायगडावर सुखरूप पोहोचले, तेव्हा हेच मदारी मेहतर स्वत: महाराजांच्या शय्येवर झोपून राहिले. आजही त्या मदारी मेहतर यांची आठवण येते. तोच सामाजिक एकोप्याचा इतिहास पुन्हा एकदा मराठे लिहीत असल्याचेही आव्हाड म्हणाले. मराठा समाज बदलतोय, मराठे पुन्हा एकदा नवीन इतिहास लिहीत आहेत आणि याच इतिहासावरून संपूर्ण महाराष्ट्र शिकेल आणि पुढे जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मराठ्यांचे हेच नेतृत्व कायम ठेवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)