न्या. टहलियानी आज निवृत्त होणार
By Admin | Updated: August 21, 2015 01:05 IST2015-08-21T01:05:24+5:302015-08-21T01:05:24+5:30
अजमल कसाब याला फाशीची शिक्षा ठोठावणारे न्यायाधीश मदनलाल लक्ष्मणदास टहलियानी तब्बल २८ वर्षे न्यायदानाची सेवा बजावून शुक्रवारी निवृत्त होत आहेत

न्या. टहलियानी आज निवृत्त होणार
मुंबई: अजमल कसाब याला फाशीची शिक्षा ठोठावणारे न्यायाधीश मदनलाल लक्ष्मणदास टहलियानी तब्बल २८ वर्षे न्यायदानाची सेवा बजावून शुक्रवारी निवृत्त होत आहेत. दंडाधिकारी ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असा पल्ला गाठणारे न्या. टहलियानी स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत.
अॅडव्होकेट असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडियाने गुरुवारी न्या. टहलियानी यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. या समारंभात अनेक ज्येष्ठ वकील, विधिज्ञ उपस्थित होते. सुनावणीत वकिलांचा युक्तिवाद ऐकण्यासोबतच ते थेट आशिलालाच प्रश्न विचारून तथ्यता पडताळून घेत, असे अॅड. एस.आर. चिटणीस यांनी सांगितले. १९८७मध्ये दंडाधिकारी म्हणून न्यायदानाची सेवा सुरू करणाऱ्या न्या. टहलियानी यांनी सत्र न्यायालयाच्या कारकिर्दीत २६/११चा हल्ला, गुलशन कुमार हत्याकांड, दत्ता सामंत मर्डर केस असे बहुचर्चित व गुंतागुंतीचे खटले हाताळले. त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश, सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश म्हणूनही जबाबदारी पार पाडली. उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार म्हणूनही त्यांनी काम पाहिले. विशेष न्यायाधीश म्हणून सीबीआयने दाखल केलेले खटलेही त्यांनी हाताळले. २०१०मध्ये त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. कसाबसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालपत्रात न्या. टहलियानी यांची स्तुती केली होती. (प्रतिनिधी)