न्या. टहलियानी नवे लोकायुक्त
By Admin | Updated: August 22, 2015 01:25 IST2015-08-22T01:25:12+5:302015-08-22T01:25:12+5:30
मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा सुनावणारे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदनलाल लक्ष्मणदास टहलियानी २८ वर्षांच्या सेवेनंतर

न्या. टहलियानी नवे लोकायुक्त
मुंबई : मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील दहशतवादी कसाबला फाशीची शिक्षा सुनावणारे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदनलाल लक्ष्मणदास टहलियानी २८ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होताच त्यांची महाराष्ट्राचे लोकायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.
राज्याचे नवे लोकायुक्त म्हणून न्या. टहलियांनी यांचा येत्या सोमवारी शपथविधी होणार आहे. राजभवनात राज्यपाल सी. विद्यासागर राव त्यांना शपथ देतील. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य मान्यवर उपस्थित राहतील. न्या. टहलियानी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून सेवानिवृत्त झाले.
राज्याला लवकरच बळकट लोकायुक्त देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. पण सध्याच्या कायद्यात दुरुस्ती करून लोकायुक्तांना अधिक अधिकार प्रदान करणारा सशक्त कायदा अजून राज्य सरकारने केलेला नाही.
कारकिर्द... वांद्रे येथील महानगर न्यायदंडाधिकारी म्हणून १९८७मध्ये करिअरची सुरुवात. १९९७मध्ये मुंबईच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश. २०००मध्ये त्यांची शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशपदी बढती. २००९मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या सुनावणीसाठी न्यायाधीश म्हणून नियुक्ती. २०१०मध्ये मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदी बढती.
(विशेष प्रतिनिधी)