बस नागपूरची, क्रमांक मात्र मध्य प्रदेशचा
By Admin | Updated: February 3, 2015 00:58 IST2015-02-03T00:58:04+5:302015-02-03T00:58:04+5:30
गोंदियातील श्री बालाजी ट्रॅव्हल्सच्या स्कूल बस कंत्राटदाराकडून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे चालविण्यात येणाऱ्या दुसऱ्या ‘स्कूल बस’चा क्रमांकही बोगस असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

बस नागपूरची, क्रमांक मात्र मध्य प्रदेशचा
बल्लारपुरातील प्रकरण : दुसऱ्या गाडीचा क्रमांकही बोगस!
गोंदिया : गोंदियातील श्री बालाजी ट्रॅव्हल्सच्या स्कूल बस कंत्राटदाराकडून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे चालविण्यात येणाऱ्या दुसऱ्या ‘स्कूल बस’चा क्रमांकही बोगस असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. बल्लारपूर पोलिसांच्या पथकाने केलेल्या तपासात मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्याचा पासिंग क्रमांक टाकलेली दुसरी बस प्रत्यक्षात नागपूर ग्रामीण परिवहन विभागाने पासिंग केलेली निघाली. त्यामुळे सदर कंत्राटदावर दुहेरी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. शिवाय बोगस कागदपत्रे सादर करून सदर बसचा करार वेकोलिसोबत स्कूलबससाठी केल्याने सदर बस मालकाने वेकोलिचीही फसवणूक केल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
गाड्यांवर बनावट नंबरप्लेट टाकून चालविल्या जात असलेल्या गाड्यांची ही बनवाबनवी ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर उघडकीस आली. आधी सावरासावर करणाऱ्या बल्लारपूर पोलिसांनी नंतर मात्र गांभीर्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला. गोंदियात अधिकृतपणे नोंदणी असलेल्या एमएच ३५, के ३८६६ ही बस गोंदियात स्कूल बस म्हणून धावत असताना हाच क्रमांक दुसऱ्याच एका गाडीवर टाकून बल्लारपूरमध्ये वेस्टर्न कोलफील्ड लि.मध्ये पांढऱ्या रंगाची एक बस चालत होती. गोंदिया परिवहन विभागातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे त्याबाबतची खात्री बल्लारपूर पोलिसांनी करून घेतल्यानंतर बल्लारपूरमधील वरील क्रमांकाने चालणाऱ्या बसवरील क्रमांक बोगस असल्याचे स्पष्ट झाले. त्यासोबतच चंद्रपूर आरटीओने एमपी २८/ पी ०२४७ या क्रमांकाच्या बसचा चेसिस व इंजिन क्रमांक तपासला. त्यावेळी तिथे पट्टीच्या खाली पुसटपणे ‘एमएच ४०’ हा क्रमांक दिसला. त्यामुळे ती गाडी मध्य प्रदेश पासिंगची नसून नागपूर ग्रामीणमधून पासिंग झालेली असण्याचा संशय पोलिसांना आला. मात्र बस मालकाने या बसवर मध्यप्रदेश पासिंगच्या नंबरप्लेटचे स्टिकर चिकटविले होते.
सहायक पोलीस निरीक्षक सिंगनजुडे यांच्या नेतृत्वातील पथकाने सोमवारी (दि.२) नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालय गाठून त्या गाडीचा चेसिस व इंजिन क्रमांक तपासला असता त्या गाडीचा क्रमांक ‘एमएच ४०/ ७४६४’ असा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही गाडीसुद्धा बनावट क्रमांक टाकून चालविली जात होती, हे स्पष्ट झाले.
दरम्यान, गोंदियात पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्कूल बस म्हणून चालत असलेली एमएच ३५, के ३८६६ क्रमांकाची गाडी बल्लारपूर पोलिसांनी ताब्यात घेऊन ती पोद्दार स्कूलमध्येच ठेवली आहे. पोलिसांच्या सूचनेशिवाय त्या गाडीला रस्त्यावर धावता येणार नाही. (जिल्हा प्रतिनिधी)