ज्येष्ठ गांधीवादी चुन्नीभाई वैद्य यांचे निधन
By Admin | Updated: December 20, 2014 03:15 IST2014-12-20T03:15:04+5:302014-12-20T03:15:04+5:30
ज्येष्ठ गांधीवादी आणि ‘आधुनिक विनोबा’ अशी ओळख असणारे चुन्नीभाई वैद्य यांचे शुक्रवारी पहाटे अहमदाबाद येथे वृद्धापकाळाने निधन झाले.

ज्येष्ठ गांधीवादी चुन्नीभाई वैद्य यांचे निधन
मुंबई : ज्येष्ठ गांधीवादी आणि ‘आधुनिक विनोबा’ अशी ओळख असणारे चुन्नीभाई वैद्य यांचे शुक्रवारी पहाटे अहमदाबाद येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मानसकन्या नीताबेन आणि त्यांचे पती महादेव विद्रोही आहेत. त्यांच्या पार्थिवावर अहमदाबादमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
आसाममधील जंगल आणि खेड्यात सर्वोदयी साहित्य रुजविण्याच्या कामापासून त्यांनी आपल्या कार्याचा प्रारंभ केला. गावाची जमीन गावाची, नाही कुणा सरकारची या आंदोलनाचे ते प्रणेते होते. वाराणसी येथे त्यांनी बारा वर्षे सर्वोदयी साहित्य प्रकाशन सांभाळले. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनादरम्यान आणीबाणीच्या काळात त्यांनी भूमिपुत्र मासिकाचे संपादन केले. ३५२ पेक्षा अधिक गावांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून त्यांनी आंदोलन केले. विनोबा भावे यांच्या विचारसरणीवर काम करत त्यांनी गरीब शेतकरी वर्गाला जमीन मिळवून देण्यासाठी सरकारशी दोन हात केले. म्हणून त्यांना ‘आधुनिक विनोबा’ या नावाने संबोधत. त्यांच्या ‘असेसिनेशन आॅफ गांधी : फॅक्ट अॅण्ड फॉल्सहूड’ या पुस्तकाचा अकरा भाषांत अनुवाद झाला असून, शेवटच्या क्षणापर्यंत गोरगरिबांसाठी ते कार्यरत राहिले. (प्रतिनिधी)