१ जूनपासून राज्यातील ६५ टोलनाके बंद
By Admin | Updated: April 10, 2015 14:23 IST2015-04-10T13:05:35+5:302015-04-10T14:23:33+5:30
येत्या १ जूनपासून राज्यातील १२ टोलनाके कायमचे बंद होणार असून ५३ टोलनाक्यांवर लहान वाहनांना टोलमुक्ती मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केली आहे.

१ जूनपासून राज्यातील ६५ टोलनाके बंद
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या टोलनाक्यांप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण घोषणा केली असून राज्यातील १२ टोलनाके कायमचे बंद होणार असून ५३ टोलनाक्यांवर लहान वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे.
१ जूनपासून या नव्या धोरणाची अमलबजावणी होणार आहे. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपाने टोलमुक्तीचे स्वप्न दाखवत मत मिळवली होती. पण सत्तेत आल्यापासून टोलमुक्ती बाबत राज्य सरकारने काहीच पावले उचलली नव्हती. यावरुन विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत टोलमुक्तीची घोषणा केली. यानुसार राज्यातील ६५ टोलनाक्यांमधून वाहनचालकांची सुटका होणार आहे. कोल्हापूर टोलनाक्यासंदर्भात चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती ३१ मे पर्यंत निर्णय घेणार आहे. मात्र मुंबईतील सहा प्रवेशद्वारांवरील टोलनाक्यावर सरकारने ठोस भूमिका घेतलेली नाही. मुंबई एंट्री पॉईंटवरील टोलनाक्यांवर ३१ जुलै रोजी निर्णय घेतला जाणार आहे.
कोणते टोलनाके होणार बंद
> ठाणे - घोडबंदर
> सोलापूर - बारामती
> औरंगाबादमधील ३ तर नागपूरमधील ५ टोलनाके होणार बंद.
> अमरावतीमधील १, चंद्रपूरमधील ३ टोलनाके बंद होणार.