रेल्वेतून उडी मारून महिला पळाली!
By Admin | Updated: January 25, 2015 01:44 IST2015-01-25T01:44:19+5:302015-01-25T01:44:19+5:30
वाघाच्या कातडीच्या तस्करीतील महिला संशयित आरोपीने बडनेरा रेल्वे स्थानकाजवळ धावत्या ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून उडी मारुन पळ काढला.

रेल्वेतून उडी मारून महिला पळाली!
बडनेरा (जि़ अमरावती) : वाघाच्या कातडीच्या तस्करीतील महिला संशयित आरोपीने बडनेरा रेल्वे स्थानकाजवळ धावत्या ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून उडी मारुन पळ काढला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता घडली. दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी तिला अकोला गुन्हे अन्वेषण शाखा व बडनेरा रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले.
मिनार निराफल चौहाण (३८,रा. राजौरी जि.दमोह,मध्यप्रदेश) असे तिचे नाव आहे. तिच्याविरुध्द नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत एक वर्षापासून गुन्हा दाखल आहे. वाघाच्या कातडी तस्करी प्रकरणात ती मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तिला अकोल्याच्या कारागृहात ठेवण्यात आले आहे.
२३ जानेवारी रोजी नागपूरच्या महिला पोलीस समुन भगत व फरजाना शेख या मिनार हिला नागपूरला पेशीसाठी घेवून गेल्या होत्या. ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधून अकोल्याकडे परतत असताना तिने बडनेरा स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून उडी मारुन पळ काढला. यची माहिती पोलीस विभागाने वायरलेसवरून आसपासच्या सर्व जिल्ह्णातील पोलीस ठाण्यांत दिली होती. त्यानुसार अकोला गुन्हे अन्वेषण शाखेने तिचा शोध घेतला असता ती शनिवारी पहाटे ७ वाजताच्या दरम्यान बडनेऱ्यातच आढळून आली. गाडीतून उडी मारताना तिच्या डोक्याला जखम झाली आहे. सध्या तिला अकोला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपी महिलेविरुध्द बडनेरा रेल्वे पोलिसांनी भादंविच्या २२४ कलामानुसार गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)