ज्येष्ठांच्या सभागृहात रंगली जुगलबंदी!
By Admin | Updated: July 9, 2016 02:16 IST2016-07-09T02:16:00+5:302016-07-09T02:16:00+5:30
विधान परिषद म्हणजे ज्येष्ठांचे सभागृह. सभापतींच्या निवडीसाठी आयोजित विशेष अधिवेशनात रंगलेली चौफेर राजकीय फटकेबाजी पाहता, येत्या काळात हे सभागृह कसे चालणार

ज्येष्ठांच्या सभागृहात रंगली जुगलबंदी!
- अतुल कुलकर्णी, मुंबई
विधान परिषद म्हणजे ज्येष्ठांचे सभागृह. सभापतींच्या निवडीसाठी आयोजित विशेष अधिवेशनात रंगलेली चौफेर राजकीय फटकेबाजी पाहता, येत्या काळात हे सभागृह कसे चालणार आहे, याची झलकही पाहायला मिळाली. ‘आपण कायम विरोधी पक्षनेतेपदीच राहा,’ अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना दिल्या, तर ‘सभागृहात सगळेच दादा आणि भाई झाले आहेत, त्यामुळे आम्ही करायचे तरी काय,’ असा सवाल सुनील तटकरेंनी केला.
‘आजवर विरोधी पक्षाने त्यांची भूमिका उत्तम प्रकारे पार पाडली आहे, पण आम्हीही त्यांना पुरून उरलो आहोत,’ अशी सुरुवात करत फडणवीस यांनी विरोधकांना मार्मिक चिमटे काढले. मात्र, सभागृह नेतेपदी निवड झालेले चंद्रकांत पाटील यांच्या बाबतीत बोलताना त्यांचा सूर मृदु झाला. ते म्हणाले, ‘मैत्री हा दादांचा छंद आहे. तसा उल्लेख त्यांच्या बायोडाटात आहे. दादा तसेच आहेत मैत्री जपणारे.’
‘सभागृह नेतेपदासाठी आम्ही तर विनोद तावडेंचे नाव ऐकत होतो, पण दादांचे नाव कसे काय आले,’ असा तिरकस सवाल करत, दादा हे कोअर ग्रुपमधले नाहीत, तर अमित शहांच्या हार्ड कोअर ग्रुपमधील आहेत, त्यामुळे हे झाले असावे,’ असे तटकरे म्हणाले. गुलाबरावांनी जळगावात जे फटाके उडवले, त्याचा सगळा खर्च गिरीश महाजन यांनी केल्याची माहिती असल्याचे तटकरे म्हणताच, सभागृहात हंशा पिकला.
राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची एवढी सेवा केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. कॅबिनेट मंत्रिपद राम शिंदे घेऊन गेले, असा चिमटाही तटकरे यांनी काढला. मुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे गिरीश महाजन आणि गिरीश बापट बसले होते. त्यावर शेकापचे जयंत पाटील हे चंद्रकांत दादांना उद्देशून म्हणाले, ‘तुम्ही चांगले काम कराल यात शंका नाही, फक्त गिरीशपासून सावध राहा...!’ त्यावर सभागृहात ‘बापट की महाजन?’असा आवाज आला. त्यावर ‘बापट बिचारे सज्जन आहेत... ते नाही हो...’ असे जयंतराव म्हणताच, मुख्यमंत्र्यांनी कपाळावर हात मारून घेतला!
सगळेच भाई आणि दादा... आम्ही काय करायचे? चंद्रकांत दादांची सभागृह नेते म्हणून निवड झाली. अजित दादा, नारायणरावांनाही दादा म्हणतात. बाकीचे जयंत भाई, भाई जगताप, रामदास भाई... किती भाई आणि किती दादा... आमच्यासारख्यांनी करायचे तरी काय, असा सवाल तटकरेंनी केला.
कोण कुठे बसेल, हे नियती ठरवेल!
तुम्ही कायम विरोधातच बसा, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. तोच धागा पकडून राणे म्हणाले, ‘कोणी कितीही सांगितले, तरीही कोण, कधी, कुठे बसेल, हे तुम्ही आम्ही नाही तर नियतीच ठरवेल...’
जडीबुटीची अदलाबदल करू!
‘शिवसेनेला एवढे मस्त मॅनेज करता, यासाठी तुम्ही कोणती जडीबुटी खाता ते तरी सांगा,’ असे शरद रणपिसे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले. त्यावर ‘अशी जडीबुटी मागून तुम्ही सत्तेत परत कसे येणार,’ असा चिमटा दिवाकर रावते यांनी काढला, तर ‘तटकरे ६१ वर्षांचे होऊनही तसे दिसत नाहीत, याचे रहस्य काय,’ असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यावर जडीबुटीची अदलाबदल करून घ्या, अशी परतफेड रणपिसे यांनी करून टाकली..!