‘जज्ज स्टिंग’ : आॅनलाइन व्हिडीओ काढण्याचे आदेश
By Admin | Updated: February 18, 2017 04:31 IST2017-02-18T04:31:49+5:302017-02-18T04:31:49+5:30
उच्च न्यायालयाच्या एका कोर्टरूममधील सुनावणी गुप्तपणे रेकॉर्ड करून ती ‘जज्ज स्टिंग’ या मथळ्याखाली यू-ट्युब व सर्च इंजीन गुगलवर

‘जज्ज स्टिंग’ : आॅनलाइन व्हिडीओ काढण्याचे आदेश
मुंबई : उच्च न्यायालयाच्या एका कोर्टरूममधील सुनावणी गुप्तपणे रेकॉर्ड करून ती ‘जज्ज स्टिंग’ या मथळ्याखाली यू-ट्युब व सर्च इंजीन गुगलवर अपलोड केल्याने उच्च न्यायालयाने शुक्रवारी यू-ट्युब व गुगलला तो व्हिडीओ काढण्याचे निर्देश दिले. तसेच न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई का करण्यात येऊ नये, याचे स्पष्टीकरण मागण्यासाठी उच्च न्यायालयाने यू-ट्युब व गुगलला ‘कारणे दाखवा’ नोटीसही बजावली.
उच्च न्यायालयाचे न्या. एस.जे. काथावाला यांच्या कोर्टरूममधील सुनावणीचे गुप्तपणे रेकॉर्डिंग करण्यात आले. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोपही करून हे रेकॉर्डिंग यू-ट्युब व गुगलवर अपलोड करण्यात आले. कोर्टरूममधील सुनावणीचे रेकॉर्डिंग करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान असल्याने बॉम्बे बार असोसिएशनने गुगल व यू-ट्युबवर अवमानाची कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठापुढे होती.
‘गेल्या आठवड्यात कोणी एका ‘राइट मिरर’ने ३८ मिनिटांचे रेकॉर्डिंग (सुनावणीचे) केले. या रेकॉर्डिंगची एक प्रत एका वृत्तवाहिनीकडे आहे. या वृत्तवाहिनीचा वृत्तनिवेदक यासंदर्भात अनेक लोकांची मुलाखत घेताना दिसत आहे. त्यात अॅड. नीलेश ओझा यांचाही समावेश आहे. या सर्वांनी न्यायाधीशांबाबत धक्कादायक विधाने केली आहेत. गोपाळ शेट्ये नावाच्या व्यक्तीने सुनावणीचे गुप्तपणे रेकॉर्डिंग केले आहे,’ अशी माहिती ज्येष्ठ वकील रफीक दादा यांनी खंडपीठाला दिली. (प्रतिनिधी)