वंचितांच्या जीवनात फुलला दिवाळीचा आनंद
By Admin | Updated: November 1, 2016 19:12 IST2016-11-01T19:12:51+5:302016-11-01T19:12:51+5:30
ज्यांच्या जीवनात पतीचे छत्र हरविले ज्या चिल्ल्यापिल्ल्यांचे पितृछत्र गेले अशा मोहीदेपुर ता. जळगाव जामोद येथे येवून उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे

वंचितांच्या जीवनात फुलला दिवाळीचा आनंद
>- ऑनलाइन लोकमत/ जयदेव वानखडे
जामोद, (जि.बुलडाणा), दि. 01 - ज्यांच्या जीवनात पतीचे छत्र हरविले ज्या चिल्ल्यापिल्ल्यांचे पितृछत्र गेले अशा मोहीदेपुर ता. जळगाव जामोद येथे येवून उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे यांनी नाथजोगी बहिणीकडून मायेने ओवाळून घेवून भाऊबीज साजरी केली. सतत पाच वर्षापासून येथे येवून भाऊबीज साजरी करतात. त्यामुळे प्रशासकीय अधिका-यांमध्येही माणुसकीचा झरा जिवंत असल्याचा प्रत्यय त्यांनी दिला.
२०१२ च्या मे महिन्यात नागपूर येथे तीन बहूरूप्यांचा दगडांनी ठेचून निर्घृण खून करण्यात आला. त्यात मोहीदेपूर येथील सुपडा नागनाथ हसन सोळंके आणि पंजाब शिंदे या तीन नाथजोगी समाजाच्या तरूणांचा समावेश होता. बहूरूप्यांचे सोंगे घेवून लोकांचे मनोरंजन करीत स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणा-या या कुटुंबावर संकटांची कु-हाड कोसळली. अशा परिस्थितीत समाजातील अनेक दातृत्वाचे हात पुढे आले. त्यावेळी जळगाव उपविभागात प्रा.खडसे एसडीओ होते. त्यांनी त्याचवेळी या तिन्ही विधवा महिलांना बहिण मानले आणि २०१२ पासून आज पाचवी भाऊबिज त्यांनी आपल्या या विधवा बहिणींसोबत साजरी केली. यामुळे वंचीत अशा या कुटुंबियांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. कारण त्यांच्याही जीवनात आनंदाची दिवाळी करणारा भाऊ त्यांना मिळाल्याचा आनंद त्या महिलांच्या चेह-यावर झळकत होता.
अकोला येथून सहकुटुंब ते ३१ आॅक्टोबरला दुपारी मोहीदेपुरात आले त्यांनी अनिला नागनाथ, संगीता सोळंके आणि सयाबाई शिंदे त्यांची मुले, मुली, सासु, सासरे, आणि नणंद या सर्वांना नवीन कपडे, साडी चोळी, मिठाई, फराळ आणि रोख रूपी भाऊबिज दिली. या तिन्ही बहिणींनी त्यांना ओवाळले, नारळ दिले. नवीन कपडे घालून मुलांनी आनंदाने उड्या मारल्या.
गरीबी परिस्थितीची मला जाणीव असून मीही अशाच कुटुंबात शिकलो आणि मोठा झालो. मोहीदेपुरातील तीन तरूणांची हत्या मनसुन्न करणारी होती. त्याचवेळी यांचा भाऊ होण्याचे मनोमन ठरविले आणि बांधीलकी जपत आज पाचव्यांदा यांच्यासोबत दिवाळी साजरी करीत आहे. यामुळे मनाला खूप मोठे समाधान मिळते असे प्रा.संजय खडसे म्हणाले. यावेळी तेथील मुलांनाही त्यांनी पुस्तके आणली होती. त्यांचे वाटप केले. याप्रसंगी सौ.निता खडसे, चि.सनीत आणि कु.साना यांच्यासह मोहीदेपुर वासियांची उपस्थिती होती.